जिल्ह्यातील "या" तीन गावातील नागरिकांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार! वाचा काय आहे कारण ?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती साठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. अश्यातच बुलडाणा लोकसभा मतदार संघातील तीन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव, खडकी, खैरखेड अशी ही तीन गावे आहेत. 
विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ग्रामस्थांनी ठरवले. तिन्ही गावात ठिकठिकाणी "मतदानावर बहिष्कार"! अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. तसेच यामध्ये वन जमिनीवरील अतिक्रमण काढणे, स्थानिक नागरिक नसताना मतदार यादीत अतिक्रमण धारकांचा समावेश करणे अशी कारणे नमूद करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.