रेखाताई खेडेकरांची लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून माघार! म्हणाल्या..."हे" शल्य कायम मनात राहील

 
Khedekar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)च्या जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई  खेडेकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी स्वतः फेसबुक वर पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली. रेखाताई खेडेकर यांच्यावर २५ मार्चला एक अत्यंत तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली, डॉक्टरांनी २ ते ३ आठवडे त्यांना सक्तीचा आराम सांगितला आहे.

सौ.रेखाताई खेडेकर यांचे नाव देखील बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत होते. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत बुलडाणा लोकसभेची जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्याची मागणी केली होती. सौ. खेडेकर ह्याच संभाजी ब्रिगेडकडून उमेदवारीच्या पक्क्या दावेदार होत्या. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने "लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण सहभागी होऊ शकणार नाही" असे त्या म्हणाल्या.


"हे" शल्य कायम मनात राहील..

फेसबूकवरील पोस्ट मध्ये पुढे त्या म्हणाल्या की, २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अनेक अंगाने महत्वाची आहे.ला लढा हुकूमशाही - भांडवलशाही प्रवृत्ती विरोधात आहे, संविधान वाचवण्यासाठी आहे. शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी यांच्या  शोषणा विरुद्ध आहे. या रणसंग्रामात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही हे शल्य कायम मनात राहील. परंतु महाविकास आघाडीच्या विजयासाठी याही परिस्थितीत कायम प्रयत्नशील राहील. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना याची कल्पना दिल्याचे त्या म्हणाल्या. शक्य तितक्या लवकर बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरण्याचा प्रयत्न करेन असेही रेखाताई खेडेकर यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.