रमजान ईदच्या दिवशी देऊळघाट व धाडमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा! रविकांत तुपकर म्हणाले,मी आजही स्वतंत्र आहे,निवडून आल्यावरही स्वतंत्रच राहील...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) - प्रत्येक समाजातून आणि समाजातील प्रत्येक घटकातून मला मिळणारा वाढता पाठिंबा आणि समर्थन पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या अफवा पसरवत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मी सर्वसामान्य जनतेने उभा केलेला स्वतंत्र उमेदवार आहे आणि रमजान ईदच्या पवित्र दिवशी सांगतो की, मी निवडून आल्यावर ही स्वतंत्रच राहील,असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी देऊळघाट व धाड येथील विराट सभेत बोलताना केले. रमजान ईदच्या दिवशी या दोन्ही ठिकाणी रविकांत तुपकर यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली.
रमजान ईदच्या दिवशी रविकांत तुपकर यांनी खामगाव येथे व इतर ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांची देऊळघाट येथे गावातून प्रचंड विराट अशी रॅली काढण्यात आली. डफड्यांच्या निनादात आणि प्रचंड उत्साहात निघालेल्या या रॅलीत मुस्लिम समाज बांधवांसह सर्वच समाजबांधव सहभागी झाले होते. तर तरुणांचा सहभाग आणि उत्साह लक्ष वेधून घेणारा ठरला. देऊळघाट आणि धाड या दोन्ही ठिकाणी झालेल्या प्रचारसभेला विराट गर्दी होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी विरोधी उमेदवारावर चांगलीच तोफ डागली. माझ्या विरोधात बोलायला त्यांना काहीच सापडत नाही त्यामुळे ते माझ्या विरोधात वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. रविकांत तुपकर या पक्षाचा माणूस आहे, त्या नेत्याचा माणूस आहे, निवडून आल्यावर तिकडे जाईल असे ते सांगत आहेत. परंतु मी कोणत्याच पक्षाचा, कोणत्या समाजाचा, कोणत्या नेत्याचा माणूस नसून सर्वसामान्य जनतेचा माणूस आहे. सर्व सामान्य जनतेने उभा केलेला मी स्वतंत्र उमेदवार असून विजयी झाल्यावरही स्वतंत्रच राहील, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी ठामपणे सांगितले.  
   गेल्या २२ वर्षात शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य जनतेसाठी लढा दिला आहे. हजारो आंदोलने केली, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांचा मार सहन केला, तडीपारी भोगली तुरुंगात गेलो हे सर्व सामान्य जनतेसाठी केले. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, अतिक्रमणधारक,आदिवासी, बारा बलुतेदार व शहरी नागरीक अशा सर्वच घटकांसाठी मी काम करत आलो आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील आणि शहरी व ग्रामीण भागातील जनता माझ्यासोबत आहे. खऱ्या अर्थाने हा लढा आता 'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती' असा झाला आहे. मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य जनतेचाच राहणार आहे. माझा विजय हा सर्वसामान्यांचा विजय ठरणार आहे. सिंदखेडराजा, शेगाव, संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ मेहुणाराजा,हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक सैलानी बाबा दर्गा यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा कायापालट होणे गरजेचे आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यात विकास नव्हे तर जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे, ही चूक आता आपल्याला दुरुस्त करायची आहे. गेल्या २२ वर्षात मी जे काम केलं त्या कामाची मजुरी म्हणून एक मत मागत आहे. नव्या संसदेत नवा चेहरा पाठवा, तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी मी संसदेत प्राणप्रणाने लढेल, असा विश्वास यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना दिला. स्वतःच्या घरची चटणी-भाकर खाऊन, आपल्या स्वतःचा पैशांची पदर मोड करून सर्वसामान्य जनतेचा हक्काचा माणूस विजय करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित विराट जनसमुदायाने केला. तर कलीम जमदार यांनी धाड येथील जाहीर सभेदरम्यान निवडणूक खर्चासाठी ५१ हजार रुपयांचा निधी दिला. तसेच इतरही शेकडॊ नागरिक एक नोट एक वोट याप्रमाणे निधी देण्यासाठी पुढे आले होते.