रविकांत तुपकर समर्थकांची बैठक दणक्यात संपन्न! तुपकरांकडून 'निर्धार परिवर्तन अभियानाची घोषणा'; शिलेदार गावागावात जावून साधणार प्रत्येक नागरिकाशी संवाद...

 
Tupkar
चिखली (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील मौनीबाबा संस्थानात आज रविकांत तुपकरांच्या घाटावरील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी रविकांत तुपकरांनी 'निर्धार परिवर्तन अभियाना'ची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत ७ मार्च पासून पुढील ७ दिवस रविकांत तुपकरांचे शिलेदार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून गावातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
   आज झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. लोकसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काय योजना आहेत याबाबत देखील चर्चा करण्यात आली. रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला घाटाखाली व घाटावरील चिखली देऊळराजा, सिंदखेडराजा तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, आता पुढील काही दिवसात ही यात्रा मोताळा, बुलढाणा व मेहकर तालुक्यात जाणार आहे. त्या दरम्यान आज रविकांत तुपकरांनी शिलेदारांचे 'निर्धार परिवर्तन अभियान' हाती घेण्याचा निर्णय या बैठकी घोषित केला. ७ मार्च पासून हे अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत पुढील सात दिवस रविकांत तुपकर यांचे शिलेदार प्रत्येक गावात पोहोचणार आहेत. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील, तसेच येणाऱ्या लोकसभेत परिवर्तनाचा निर्धार या अभियानात केला जाणार आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने विविध टीम तयार करण्यात आल्या असून या अभियानाच्या संपूर्ण नियोजन या बैठकीत पार पडले.  
           
   यावेळी बोलतांना तुपकर म्हणाले की, माझ्याकडे कमिशनचा पैसा नाही, कोणताच दोन नंबरचा पैसा नाही. पण माझ्याकडे गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहेत आणि हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीच्या जोरावरच `एक नोट एक वोट´ या तत्त्वानुसार आपण लोकसभेची निवडणूक लढविणार आणि परिवर्तन करणार आहोत. आता वार फिरलं आहे, गावातील जनता आणि तरुण पेटून उठले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आपल्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही त्यामुळे आता विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवतील, खॊट्या-नाट्या बातम्या पसरवतील त्यामुळे सर्वप्रथम कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, जागरूक राहावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. गेल्या २२ वर्षात आपण केवळ चळवळीला वाहून घेतले आहे. आपण कधीच काही मागितले नाही, आता 'एक नोट एक वोट' या नुसार जिल्ह्यात परिवर्तन घडविण्याचा निर्धार आपण केला आहे. असे देखील तुपकरांनी यावेळी सांगितले. तर तुमचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. तन-मन-धनाने तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली तसेच जिल्ह्यात निर्धार परिवर्तन अभियान यशस्वी करण्याची शपथ यावेळी घेतली.
भाऊ आता ही लढाई आमची
भाऊ तुम्ही गेली २२ वर्ष घरादारावर तुळशी पत्र ठेवून केवळ सर्वसामान्य जनतेसाठी लढा देत आहात. अनेक केसेस तुम्ही अंगावर घेतल्या पोलिसांचा लाठीमार सहन केला तुरुंगवास भोगला, तडीपारी सहन केली..अनेक संकटे तुमच्यावर आली..पण जीवाची परवा न करता तुम्ही शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्यांसाठी तरुणांसाठी आंदोलने केली. या सर्व मोबदल्यात तुम्ही कधीच काही मागितले नाही. त्यामुळे आता तुमच्या पदरात मतांचे दान टाकून जिल्ह्यात परिवर्तन घडविणे ही आमची जबाबदारी आहे. आता ही लढाई तुमची नाही तर ही लढाई आमची आहे आणि आमची लढाई आम्ही जिंकणारच असा निर्धार यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.