रविकांत तुपकरांचा झंझावात उद्या ०९ मार्चला संत नगरी शेगावात! निर्धार मेळाव्याला करणार संबोधित

 
शेगाव
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरातून जोरदार समर्थन मिळत आहे. काहीही झाले तरी यंदा लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार सर्वसामान्य नागरिक व समर्थकांनी केला आहे. दरम्यान उद्या, ९ मार्चला रविकांत तुपकर संत नगरी शेगावात निर्धार मेळाव्याला संबोधित करणार आहेत. काळपांडे जिन जवळील पांडुरंग कृपा/ कुणबी समाज मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.
  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गेल्या १३ दिवसांपासून जिल्ह्यात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. घाटाखालील चार तालुके पिंजून काढून ही यात्रा आता घाटावर चिखली, देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये धडकली आहे. प्रत्येक ठिकाणी रविकांत तुपकरांच्या या निर्धार परिवर्तन यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ५ मार्च रोजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलीत पदाधिकारी व समर्थकांचा तातडीची बैठक पार पडली. बैठकीत ठरल्याप्रमाणे ७ मार्चपासून निर्धार परिवर्तन अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत तुपकर यांचे शिलेदार गावागावात पोहचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, लोकसभेत परिवर्तन करण्याचा निर्धार देखील गावागावात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या, ९ मार्चला शेगावात तुपकर यांच्या लढवय्या शिलेदारांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात तुपकर नेमके काय बोलणार? करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेगाव तालुक्यातील रविकांत तुपकर मित्र मंडळाने केले आहे.