आजपासून रविकांत तुपकरांचा राज्यव्यापी दौरा! दुपारी नागपुरात घेणार पत्रकार परिषद! वाचा रविकांत तुपकर कुठे कुठे जाणार...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २३ ऑक्टोबरला बुलडाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ३० ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्ट्यात राज्यव्यापी दौरा, १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर बुलडाणा जिल्ह्यात रथयात्रा आणि २० नोव्हेंबरला दुपारी बुलडाण्यात एल्गार महामोर्चा असे आंदोलनाचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून रविकांत तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. नागपुरातून या दौऱ्याला प्रारंभ होणार असून तुपकर नागपुरात दाखल झाले आहेत.
 

आज,२५ ऑक्टोबरच्या  दुपारी १२ वाजता नागपुरातील प्रेस क्लब मध्ये रविकांत तुपकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता वर्धा येथील शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीत तुपकर शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. २६ ऑक्टोबरला यवतमाळ आणि अमरावती, २७ ऑक्टोबरला अकोला, २८ ऑक्टोबरला लातूर, २९ ऑक्टोबरला बीड,३० ऑक्टोबरला बुलडाणा आणि हिंगोली असा तुपकर यांचा राज्यव्यापी दौरा असणार आहेत. दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी ते शेतकऱ्यांच्या बैठकी घेतील. पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. २९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे सोयाबीन कापुस एल्गार परिषद होणार आहे तर ३० ऑक्टोबरला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे देखील सोयाबीन कापूस एल्गार परिषद होणार आहे. या दोन्ही परिषदांना रविकांत तुपकर उपस्थित राहणार आहेत. १ नोव्हेंबरला शेगावात संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर तुपकर यांची रथयात्रा सुरू होईल..