चिखलीत रविकांत तुपकरांचा धुमधडाका;विक्रमी रॅली अन् जंगी सभेने केला माहोल;विरोधकांच्या पाकीट व दबावाला बळी न पडण्याचे तुपकरांचे आवाहन! रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहील म्हणाले...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या चिखलीत आज २२ एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचा धुमधडाका पहायला मिळाला. चिखलीकरांना आश्चर्याचा धक्का देणारी विक्रमी प्रचार रॅली आणि जंगी सभेने 'पाना'चा माहोल पहावयास मिळाला. ही रेकॉर्ड ब्रेक रॅली व सभा विरोधकांना धडकी भरवणारी तसेच चिखली शहरवासियांना तुपकरांच्या विजयाचा विश्वास निर्माण करुन देणारी ठरली, हे विशेष. आपल्या पाठिशी जसामान्यांची ही अफाट ताकद पाहता विरोधकांकडे आता कोणताच पर्याय उरला नाही त्यामुळे ते आता खोट्या अफवा, चुकीचे आरोप करत आहेत आणि उरलेल्या तीन दिवसात पाकीट व दबावाचा वापर होऊ शकतो त्याला बळी पडू नका, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले.

सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, मोताळा, साखरखेर्डा, खामगाव, जळगाव जामोद या मोठ्या शहरांनंतर जिल्हाची राजकीय राजधानी असलेल्या चिखलीत रविकांत तुपकरांची निघालेली विराट प्रचार रॅली व त्यानंतर झालेली सभा जनसामान्यांची ताकद सिद्ध करणारी ठरली. या रॅलीत शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांसह तरुण, महिला, अल्पसंख्याक समाज तसेच सर्वच समाजघटकातील नागरिक, वयोवगृद्ध नागरिक, लहान-मोठे व्यापारी, शहरातील मध्यमवर्गीय जनता असे सर्वच स्तरातील लोक एकत्र आले होते. या रॅलीत सहभागी असलेल्या प्रत्येेकामध्ये प्रचंड उत्साह आणि चेहऱ्यावर ठाम विश्वास दिसून येत होता. रणरणत्या उन्हातही प्रचंड जोशात निघालेली ही रॅली शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. बैलजोडीचे पूजन करुन 'जनतेचा कणखर बाणा, निवडूण आना पाना' अशा घोषणा करत प्रचंड उत्साहात ही निघाली. यावेळी चिखलीकरांनी तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शहरातील प्रमुख मार्गाने फिरल्यानंतर प्रचार सभा झाली. 

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, मी २२ वर्षे सर्वसामान्य जनता आणि समाजातील सर्वच घटकांसाठी संघर्ष केला आहे. हा २२ वर्षांचा लढा वाया जाऊ देऊ नका. यापुढेही मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्यांसाठीच लढत राहणार आहे.  दुसऱ्यांच्या नावावर मत मागण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. मी सर्वसामान्य जनतेच उमेदवार आहे, कोणत्याच नेत्याचा वा पक्षाचा नसून स्वतंत्र आहे आणि निवडूण आल्यावरही स्वतंत्रच राहील, असा विश्वास तुपकरांनी दिला. ज्यांनी तीन वेळा पक्ष बदलला त्यांनी मला निष्ठा शिकवू नये, असा टोलाही त्यांनी विरोधी उमेदवारास लगावला. मी जातीवादी, धर्मवादी नसून माणवतावादी माणूस आहे, म्हणून सर्व जाती, धर्मातून सर्वसामान्यांचा आशिर्वाद मला मिळत आहे. ही निवडणूक एकट्या रविकांत तुपकरची निवडणूक नसून ही परिवर्तनाची लढाई आहे. विरोधकांकडे माझ्या विरोधात काहीच मुद्दे नसल्योन अफवांचा बाजार उठवत आहेत. मला संपूर्ण जिल्ह्यात मिळत असलेला जोरदार प्रतिसाद आणि आशिर्वाद पाहता आता ते खचले आहेत. त्यामुळे आता ते धनशक्तीचा वापर करु लागले आहेत. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्कल प्रमुख यांना पाकीट येण्यास सुरुवात झाली आहे.

पुढच्या तीन दिवसात ते पाकीट आणि दबावाचा वापर करतील परंतु त्यांच्या पाकीट आणि दबावाला बळी पडू नका, आपल्या हक्काची लढाई आपण जिंकणारच आहे, त्यामुळे पुढील तीन दिवस सजग राहा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. तर आता कोणत्याच मोहाला, दबावाला आणि अफवांना बळी पडणार नाही, प्रत्येकाने मनाचा पक्का निर्धार केला असून 'जनतेचा बाणा, तुपकरांचा पाना'शंभर टक्के विजयी होणार, अशी खात्री उपस्थितांनी शपथेवर दिली.

Ghhg              advt