रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला चिखली तालुक्यात भरघोस प्रतिसाद! तुपकर म्हणाले, परिवर्तन ही काळ्या दगडावरची रेख!सामान्य जनता आता परिवर्तन घडविणारच

 
चिखली
चिखली (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गाव खेड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गावात वाडीवस्तीवर सर्वसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या मनात तीव्र असा रोष दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनताच जिल्ह्यात परिवर्तन घडविणार ही काळ्या दगडावरची रेग आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान बोलताना केले. चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेला अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला. गावागावात रविकांत तुपकरांचे जंगी स्वागत करण्यात आले.
  घाटाखालील चार तालुके पिंजून काढल्यानंतर आता रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा घाटावर पोचली आहे. ०२ मार्च रोजी चिखली तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले. घाटाखाली ज्या पद्धतीचा भरघोस प्रतिसाद या यात्रेला मिळाला त्याच तुलनेत घाटावर देखील चिखली तालुक्यात या यात्रेला अतिशय उत्साही प्रतिसाद दिसून आला. ०२ मार्च रोजी चिखली तालुक्यातील माळशेंबा, साकेगाव, खोर, भोकर, पळसखेड दौलत, गोद्री, चांदई, मुंगसरी, खैरव, अंबाशी, उत्रादा या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. या सर्व गावांमध्ये रविकांत तुपकरांचे अतिशय जोरदार स्वागत झाले. दरम्यान रविकांत तुपकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जिल्हाभर फिरत असतांना वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित तरुण, बचत गटाच्या महिला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून कोणतेच ठॊस असे पाऊल उचलले गेले नाही, त्यामुळे आपल्या जिल्ह्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. या सर्व समस्या घेऊनच ही निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. या यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पावलोपावली नवी ऊर्जा आणि बळ देत आहेत. हीच सर्वसामान्य जनता आता जिल्ह्यात परिवर्तन घडविणार आहे, असे यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले.
           यावेळी भगवानराव मोरे,विनायक सरनाईक,नितीन राजपूत, भारत वाघमारे, राम अंभोरे, अमोल मोरे, संतोष शेळके, गजानन कुटे, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, विठ्ठल शेळके, निलेश धोंडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते...