नोटिसा धुडकावून रविकांत तुपकरांचा बेमुदत 'अन्‍नत्याग' सुरू!

उद्यापासूनच्या राज्यव्यापी आंदोलनाचा वणवा पेटला; बळीराजामुळे कोरोना फैलतो मग मोठे नेते काय कोविडप्रूफ जाकेट घालून आलेत? प्रशासनाला सवाल
 
file photo

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील लाखो सोयाबीन- कापूस उत्पादकांसाठी आरपारची लढत ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने अनेक अडचणींचा सामना करत निर्णायक टप्पा गाठला आहे. आता या महाआंदोलनाने अन्‌ त्याचे नेतृत्व करणाऱ्या रविकांत तुपकरांनी उपराजधानीत लागू संचारबंदी अन्‌ पोलिसांनी बजावलेल्या नोटीसा धुडकावून लावत संविधान चौकात आज, १७ नोव्‍हेंबरपासून अन्‍नत्याग आंदोलन सुरू करून, उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाचं रणशिंग फुंकले!

सकाळी आठच्या सुमारास कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा गराडा अन्‌ गगनभेदी घोषणांच्या तालावर निर्भयपणे रविकांत तुपकर आंदोलनस्थळी विसावले. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उपेक्षित लाखो शेतकऱ्यांची कथा अन्‌ व्यथा मांडली. त्यांची शोकांतिका, त्यांच्या कुटुंबांची फरफट, जीवन मरणाचा संघर्ष अन्‌ त्यापलीकडे गेल्यावर, जगणं अशक्य झाल्यावर सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या मालिकेचा लेखाजोखा सादर केला.

पहा व्हिडिओ ः

नागपुरातील संचारबंदी, संभाव्य कोरोना प्रसाराची शक्यता अन्‌ पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा यावर माध्यमांनी विचारले असता तुपकर भडकले आणि त्यांनी सर्वांनाच आडव्या हाताने फैलावर घेतले. पोलिसांचे दर आंदोलनावेळी मिळणारे नोटीस रुपी लव्ह लेटर्स, गुन्हे अन्‌ केसेस आम्हाला काही नवीन नसून, संचारबंदी अन्‌ या नोटिसांना स्वाभिमानी मोजत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. पोलीस, जिल्हा प्रशासनावर थेट अन्‌ आजपासून विदर्भात दाखल झालेल्या "जाणता राजा'चा दौरा, कालपरवा झालेला भाजपच्या कार्यक्रमावर अप्रत्यक्ष टोला लगावला. मोठ्या नेत्यांच्या मोठ्या कार्यक्रमाला परवानगी देऊन अधिकारी शेपूट घालतात. दुसरीकडे आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारतात याला काय म्हणावं? आमच्यामुळे कोरोना फैलावतो अन्‌ मग मोठे नेते अन्‌ त्यांचे चेले काय  कोविड प्रूफ जाकीट घालतात काय? असा करडा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एकाला एक न्याय अन्‌ दुसऱ्याला एक न्याय असा पक्षपात करू नये असे बजावून शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा खळबळजनक इशाराही तुपकरांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.

७ नोव्हेंबरपासून विदर्भ, मराठवाडा व खानदेशात आंदोलनासाठी पूर्वतयारी दौरे करून रात्रंदिवस शेकडो सभा, बैठका घेणाऱ्या तुपकरांना कालपासून अंगात ताप आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याला विनम्रपणे नाकारून त्यांनी अन्‍नत्याग सुरू केला. आपण एकटे अन्‍नत्याग करणार असे बजावल्यावरही शेकडो शेतकरी, कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत अन्‍नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे.

म्‍हणून छेडले आहे आंदोलन...
राज्याच्या ५० टक्के म्हणजे ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा झाला. कपाशीचा पेराही लक्षणीय ठरावा. मात्र आधी अस्मानी व नंतर सुलतानीने लाखो उत्पादकांना उद्‌ध्वस्त करण्याचे पाप केले. सोयाबीनचे भाव ११ हजार क्विंटलवर असताना केंद्राने लाखो मेट्रिक टन सोया पेंड, खाद्य तेल आयातीचा, आयात शुल्क शून्य करण्याचा, स्थानिक व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लादण्याचा घातक निर्णय घेतला. कपाशीचीदेखील अशीच कथा अन्‌ व्यथा. हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव अन्‌ सरकारने दिलेली मदत भिकेसारखी! पीक विमा कंपन्या तर लुटायलाच बसलेल्या. याउप्परही लाखो उत्पादक शेतकऱ्यांच्या अश्रू व समस्यांकडे प्रस्थापित पक्ष, नेते, सत्ताधारी व विरोधक सर्वांनीच पाठ फिरविली. त्‍यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता मैदानात उतरली आहे.