रविकांत तुपकरांच्या एल्गार परिवर्तन मेळाव्यांना मिळतोय जोरदार प्रतिसाद! अंचरवाडी व अंभोडा वासियांनी केले तुपकरांचे जंगी स्वागत...तर सभांना नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी

 
Tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  रविकांत तुपकरांच्या मेळाव्यांना जिल्हाभरात जोरदार प्रतिसाद मिळत असून तोच प्रतिसाद २० फेब्रु. रोजी बुलढाणा तालुक्यातील अंभोडा व २१ फेब्रु. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे झालेल्या एल्गार परिवर्तन मेळाव्यातही बघायला मिळाला. दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. तर गावकऱ्यांनी तुपकरांची मिरवणूक काढून जंगी स्वागत ही केले. गेल्या २२ वर्षांपासून आपण शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, तरुण महिला व सर्वसामान्यांसाठी लढत आलो आहे. या काळात अनेक संकटे झेलावी लागली, मात्र आपण हा लढा कधीच सोडला नाही आणि यापुढेही हा लढा मोठा ताकदीने सुरूच राहील त्यासाठी तुम्हां सर्वांच्या खंबीर साथीची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. परिवर्तनाच्या या लढाईत तुम्ही फक्त साथ द्या, परिवर्तन घडवूनच दाखवेल, अशा भावना रविकांत तुपकरांनी या मेळाव्यांत बोलतांना व्यक्त केल्या. 

अंचरवाडी येथील मेळाव्या आधी तुपकरांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला. तुपकरांना तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेली याचिका बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर तुपकर समर्थकांचा जल्लोष बघायला मिळाला. अंचरवाडी गावकऱ्यांनी डिजे लावत व जेसीबीने फुलं उधळत रविकांत तुपकरांचे जल्लोषात स्वागत केले. तर २० फेब्रु. रोजी अंभोडा येथे झालेल्या मेळाव्या आधीही गावकऱ्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून तुपकरांचे स्वागत केले. तर बुलढाणा तालुक्यातील तांदूळवाडी, हतेडी बु. हतेडी खुर्द गावकऱ्यांनी तुपकरांची गाडी आडवून त्यांचे स्वागत केले. माझ्यावर अनेक संकटे येत आहेत, पण तुमच्या खंबीर साथीमुळे ती संकटे उधळून लावायला दुप्पट ताकद मिळत आहे.

तुम्ही उधळलेले प्रत्येक फुलांच्या पाकळीमुळे लढायला नवी ऊर्जा मिळत आहे. आज जिल्ह्यात आपल्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद बघून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला जात आहे. पण न्यायदेवते त्यांचा हा कट उधळून लावला आहे. मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझा लढा सोडणार नाही, येणाऱ्या लोकसभेत परिवर्तनाची नितांत गरज आहे. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या आणि परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना केले. या दोन्ही मेळाव्यांना पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.