बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून रविकांत तुपकरांच्या निवडणूक प्रचारासाठी मदत! सारोळा मारोती येथील गोपाळ शिपळकर म्हणतात, शेतकऱ्याच लेकरू संसदेत पोहचलं पाहिजे, त्यासाठी जीव द्यायला तयार...

 
मोताळा
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एप्रिल महिन्याच्या तळपत्या उन्हात बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होते आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर या निवडणुकीसाठी मैदानात उतरले असून उद्या,२ एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तुपकर यांना सर्वच स्थरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे, एक वोट एक नोट या सूत्रावर तुपकर निवडणूक लढवत असून आता ही निवडणूक थेट जनतेनेच हाती घेतली आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्याचे तुपकर सांगत आहेत. दरम्यान तुपकर यांच्या निवडणूक खर्चासाठी एका शेतकऱ्याने पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र मोडून ती रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे .मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील गोपाल रामचंद्र शिपलकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
  गोपाल रामचंद्र शिपलकर यांची ३ एकर शेती आहे. पत्नी ,३ मुली आणि १ मुलगा असा गोपाल शिपलकर यांचा परिवार.! ३ एकर शेती, त्यातही या परिसरावर नेहमीच दुष्काळाची छाया, त्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने गोपाल शिपलकर हे ऑटो देखील चालवतात. याशिवाय खदानीवर मजुरी करण्यासाठी देखील जातात. "मी गेल्या १५ वर्षांपासून रविकांतभाऊंना ओळखतो, शेतकऱ्यासाठी तो माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालतो, पीक विमा, अतिवृष्टीची मदत जे काय आम्हाला मिळतं ते केवळ त्यांच्यामुळेच..त्यामुळे आता त्यांचा आवाज संसदेत पोहचला पाहिजे. शेतकऱ्याच लेकरू सभागृहात गेलं पाहिजे.त्यासाठी बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र मोडून निवडणूक खर्चासाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही मंगळसूत्र काय बसलात, ते आपल्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालतात, त्यामुळे त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असल्याचे गोपाल शिपलकर म्हणाले.