'रविकांत तुपकर युथ फाउंडेशन'चा उपक्रम...पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबिर!पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी; दीड लाखाच्या औषधीचे मोफत वाटप

 
nsdjkfjdk
जळगाव जामोद(बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सहकाऱ्यांनी 'रविकांत तुपकर युथ फाऊंडेशन'च्या माध्यमातून पूरग्रस्त भागात वैद्यकीय कॅम्पचे आयोजन केले होते. या वैद्यकीय सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवशी पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करुन दीड लाखांपेक्षा अधिक रकमेची औषधी वाटप करण्यात आली.
 

पूर ओसरल्यानंतर या भागात रोगराई पसरत आहे. डोळे येण्याची प्रचंड साथ या भागात आली आहे. पोटाचे विकार तसेच ताप, सर्दी, खोकला आणि गढुळ पाण्याचे इन्फेक्शन दिसून येत आहे. त्यामुळे या भागात वैद्यकीय सेवेची सर्वांत जास्त आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेवून २७ जुलै रोजी 'रविकांत तुपकर युथ फाऊंडेशन'च्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे वैद्यकीय कॅम्पच्या माध्यमातून पूरग्रस्तांची सेवा करण्यात आली. या दोन्ही गावांतील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अशा जवळपास ५०० हून अधिक रुग्णांची यावेळी तपासणी करून, जवळपास दीड लक्ष रुपयांची औषधे मोफत वाटप करण्यात आली. 
     या आरोग्य शिबिरासाठी मेहकर येथील डॉ. राहुल टाले, डॉ. विशाल बाजड, डॉ. रितेश बचाटे तर बुलढाणा बुलढाणा येथील डॉ. अंकिता भराड, डॉ. कल्याणी पाटील यांनी वैद्यकीय सेवा दिली. तर सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी ॲड. शर्वरी सावजी-तुपकर, 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, अनंता मानकर, अक्षय पाटील, नानाभाऊ पाटील, सुनील अस्वार, काथरगावचे सरपंच सौ. सुवर्णा गणेश टापरे, मडाखेड खुर्दचे मा. सरपंच राजू पाटील, पवनकुमार देशमुख, आकाश माळोदे, निखिल बॅटरी & ट्रेडिंगचे निखील पाटील, वैभव आखाडे, पियुष चव्हाण, विवेक ठाकरे, देवा आखाडे, सचिन शिंगोटे, सदाशिव जाधव, गोपाल सुरडकर, अजय बावस्कर, राजू पाटील, अखिल खान, अरविंद भोंगळ, भास्कर तांदळे, श्रीकृष्ण मसुरकार, अमर राहाटे, वैभव जाने, अविनाश पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. रविकांत तुपकर गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागात भेटी देत आहेत. शेतकरी, पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील 'रविकांत तुपकर युथ फाऊंडेशन'च्या माध्यमातून वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.