रविकांत तुपकर घाटावर जिंकले पण घाटाखाली हरले! घाटावरच्या ४ मतदारसंघात तुपकरांना १० हजार ९७९ मतांचे मताधिक्य; खा. जाधवांपेक्षा १६०८३ मते जास्त! घाटाखाली "गेम" झाला..

 
Nznx

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेची निवडणूक यंदा अंत्यंत चुरशीची झाली. खा.प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा खासदार झाले असले तरी यंदा त्यांचे मताधिक्य घटले. एवढेच काय तर गत निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेणाऱ्या खा. जाधव यांना यंदा केवळ खामगाव आणि जळगाव जामोद मध्ये आघाडी मिळाली, मेहकर मध्येही ते आघाडीवर राहिले मात्र ती आघाडी केवळ २४३ मतांची होती. खामगाव आणि जळगाव जामोद या घाटाखालच्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या भरवश्यावर विजय साकारणारे खा.जाधव घाटावरच्या मेहकर, सिंदखेडराजा , चिखली, येथील बुलडाणा या मतदारसंघांमध्ये पडलेल्या मतांच्या बेरजेत तिसऱ्या क्रमांकावर दिसतात. विशेष बाब म्हणजे घाटावरच्या ४ विधानसभा मतदारसंघाची बेरीज केली तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अव्वल ठरतात. घाटावर नरेंद्र खेडेकरांपेक्षा १० हजार ९७९ आणि खा.जाधव यांच्यापेक्षा १६०८३ इतकी मते घेत आघाडी घेणाऱ्या तुपकरांना घाटाखाली अपेक्षित यश मिळाले नाही. एवढेच नव्हे तर घाटावर पिछाडीवर असणाऱ्या खा.जाधव यांनी घाटाखालील दोन मतदारसंघात तब्बल १ लाख ५० हजार ८६५ इतकी मते घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तुपकर घाटावर जिंकले पण घाटाखाली हरले असाही एक अर्थ या निवडणूक निकालातून निघत आहे.

  रविकांत तुपकर अपक्ष रिंगणात असूनही त्यांनी जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवार कुठे स्पर्धेत राहतो असे म्हणणाऱ्यांना हा निवडणूक निकाल जोरदार चपराक ठरला आहे. भलेही तुपकर जिंकले नसतील मात्र त्यांनी पहिल्याच निवडणुकीत घेतलेली मते कमी नाहीत. बलाढ्य विरोधक समोर असतांना तुपकर यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, शेतकरीपुत्रांच्या भरवश्यावर ही निवडणूक लढली. नुसतीच लढलीच नाही तर निकालाच्या दिवसांपर्यंत लाखो मतदारांना त्यांच्या विजयाची अपेक्षाही होती.
घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघात मिळून तुपकर यांना २ लाख १३ हजार ८०७ एवढी मते मिळाली. खा. जाधवांचे होमग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभेत अपक्ष उमेदवार तुपकर यांनी दोन्ही प्रस्थापितांना कडवी झुंज दिली. चिखली आणि बुलडाणा विधानसभेत तुपकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले तरी त्यांनी घेतलेली मते कमी नव्हती. सिंदखेडराजा विधानसभेत तर तुपकरांनी एकहाती बाजी मारत तब्बल ७४ हजार ७५५ एवढी मते घेत २९९९७ मतांची आघाडी घेतली. घाटावरच्या ४ विधानसभांच्या बेरजेत खा.प्रतापराव जाधव यांना १ लाख ९७ हजार ४२४, नरेंद्र खेडेकर यांना २ लाख २ हजार ८२८ तर रविकांत तुपकर यांना २ लाख १३ हजार ८०७ एवढी मते आहेत. घाटावर पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या तुपकर यांना घाटाखालील खामगाव विधानसभेत केवळ २० हजार ९९७ आणि जळगाव जामोद मध्ये १४ हजार २४१ मते मिळाली. खा.जाधव यांनी खामगावात ७५ हजार ३८२ आणि जळगाव जामोद मध्ये ७५ हजार ४८३ मते घेतली,तुपकर त्या तुलनेत खूप मागे पडले त्यामूळेच घाटावर जिंकलेले तुपकर घाटाखाली हरले आणि पुन्हा घाटावर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले खा.प्रतापराव जाधव पुन्हा एकदा खासदार झाले..