मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मुंबईत गेलेल्या रविकांत तुपकरांनाअटक! थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार...

 
Tupkar

मुंबई ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली होती. तेव्हापासून पोलीस तुपकर यांच्या शोधात होते. मात्र पोलिसांना चकमा देऊन रविकांत मुंबईत दाखल झाले होते. ठरल्याप्रमाणे आज, २३ ऑगस्टला रविकांत तुपकर आंदोलन करणार होते. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली आहे. थोड्याच वेळात तुपकर यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांना न्यायालयात जामीन मिळतो की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकरी देखील मुंबईत दाखल झाले होते त्यांनी गिरगाव चौपाटी परिसरात आत्महत्येचे प्रात्यक्षिक करण्याचे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्या शेतकऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 रखडलेला पीक विमा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, शेतमालाला भाव, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अनुदान याप्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ' लक्षवेधी' आंदोलन सुरू केले. तुपकरांचे आगळेवेगळे आंदोलन नेहमी प्रशासनासाठी धसकी ठरतात. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवणार असल्याचा गंभीर इशारा तुपकर यांनी दिला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी दोन दिवसा आधीच त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांना हुल देत अखेर तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल झाले. मात्र, वर्षा बंगल्यावर पोहचण्या आधी पोलिसांनी सर्वप्रथम शर्वरी तुपकर यांना ताब्यात घेतले. त्यांनतर रविकांत तुपकर यांनाही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलक आक्रमक झाले असून, मुंबई येथील गिरगाव चौपाटी परिसरात आत्महत्या प्रात्यक्षिक आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे पुढचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.