Amazon Ad

रविकांत तुपकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज! शेतकरी,कष्टकरी, तरुण, महिला व शहरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे तुपकरांचे आवाहन..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे फायरब्रँड नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल रोजी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने ते आपला लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक माझी एकट्याची नसून तमाम शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि शहरातील बांधवांची ही लढाई आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
रविकांत तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या सभांना जिल्हाभरात प्रचंड पाठिंबा मिळत आहे. लोक त्यांना निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीही देत आहे. सध्या ग्रामीण भागात व शहरी भागातही तुपकरांची लाट निर्माण झाल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्याने, आशीर्वादाने आणि सहकार्याने रविकांत तुपकर २ एप्रिल रोजी मंगळवारी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्व सामान्यांचा उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांसाठी लढा देत आहे. अनेक आंदोलने केली, तडीपार झालो, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो आणि सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून दिला. शहरी नागरिकांसाठी देखील वारंवार सत्याग्रह केला. माझा हा संघर्ष जर तुम्हाला वाया जाऊ देत नसेल तर स्वतःच्या खर्चाने, घरच्या भाकरी बांधून आशीर्वाद देण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी मंगळवार, २ एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार जवळील टिळक नाट्य मंदिराच्या खुल्या मैदानात सकाळी १०.०० वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी केली आहे. 
 
बुलढाणा चला हो बुलढाणा चला...
 
ग्रामीण व शहरी भागात सध्या रविकांत तुपकरांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याचीच जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. गावॊगावचे तरुण गावातील प्रत्येक घरी जाऊन अगदी लग्नाच्या अक्षदा दिल्याप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी बुलढाणा येण्याचे निमंत्रण देत आहेत. बुलढाणा चला हो बुलढाणा चला... अशीच हाक सध्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे.