रविकांत तुपकर म्हणतात,सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ! एल्गार रथयात्रेचे गावोगावी होतेय जल्लोषात स्वागत...

 
शेगाव/खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे. विदर्भ-मराठवाड्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येचे उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान सरकारने राज्यातील केवळ चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ दाखवून उर्वरित तालुक्यांमधील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोनच तालुक्यांमध्ये शासनाला दुष्काळ दिसतो इतर तालुके मात्र दिसून येत नाही. सरकारच्या डोळ्यावरची ही धुंदी उतरण्यासाठी ही एल्गार रथयात्रा असून, २० नोव्हेंबरला होणाऱ्या महामोर्चातून सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.
  Nfnf
शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. याच दिवशी शेगाव तालुक्यातील गौलखेड, जलंब, पहूरजीरा तर खामगाव तालुक्यातील वाडी, माक्ता, माक्ता-वाडी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, कुंबेफळ, ढोरपगाव भालेगाव व काळेगाव या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. तर आज सहा नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील नांद्री,वर्णा,कंझारा, शिरसगाव देशमुख येथे यात्रेदरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तर दुपार नंतर रोहणा,खुटपुरी,मांडका फाटा,धापटी,गोंधणापूर फाटा येथे शेतकऱ्यांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आवार, अटाळी, गौंढाळा, लाखणवाडा या गावांमध्ये सभा पार पडल्या. पहिल्या व दुसऱ्या दिवशी एल्गार रथयात्रेचा शेगाव व खामगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांनी जल्लोषात स्वागत केले.
   यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, विदर्भ- मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच भागात यंदा निसर्गाने हुलकावणी दिल्याने तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना राज्य शासनाने केवळ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. इतर तालुक्यांमध्ये शासनाला सर्वत्र हिरवेगार दिसत आहे का? असा संतप्त सवाल करत सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा,सोयबीन-कापसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सरसकट एकरी १० हजार रुपये मदत मिळावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती त्याचबरोबर सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी यावर्षीचा लढा आहे. या आर-पारच्या लढाईसाठी शेतकरी, शेतमजूर,तरुणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
Bzbz
      या यात्रेत रविकांत तुपकरांसह श्याम अवथळे, वासुदेवराव उन्हाळे,डॉ.ज्ञानेश्वर टाले,अमोल राऊत, भगवानराव मोरे, नितीन राजपूत, अनंता मानकर, अक्षय पाटील भालतडक, नारायण लोखंडे, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, डॉ.विवेक सोनुने, कपिल पडघान, मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकर, नाना पाटील, गजानन भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.