शिंदेंच्या शिवसेनेने केलेले आरोप रविकांत तुपकरांनी फेटाळले!
खा. जाधव, आ. रायमुलकरांना केले सवाल; म्हणाले,आधी खासदार झोपले होते का? तुमचा भाऊ शेतकऱ्यांची केस घ्यायला का पुढे येत नाही? "या" कारणामुळे त्यांच्या झोपा खराब झाल्या म्हणाले..

चिखलीच्या गाडे व आणखी एक अशा तिघांनी शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. जेव्हा शेतकऱ्यांनी ही बाब मला सांगितली त्या दिवसापासून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि त्यानंतर लगेच दीड तासांत गुन्हा दाखल झाला. असे असले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी असल्याचे तुपकर म्हणाले.
अलीकडच्या दोन पाच वर्षात अधिक भावाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भातील कायदाच तकलादू असल्यामुळे गुन्हेगारांना अभय आणि शेतकऱ्यांना भय अशी परिस्थिती आहे. आधीच अतिवृष्टी, अवकाळी यामुळे शेतकरी संकटात आहे. शेतीमालाला भाव नाही यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठयावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवून करणाऱ्या व्यापाऱ्यांना काय शिक्षा करायची ती करा मात्र पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे तात्काळ मिळाले पाहिजेत असे तुपकर यावेळी म्हणाले.
नेमंक काय झालं..?
रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड शर्वरी तुपकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाढे बंधूचे वकीलपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, माझे सासरे ॲड. सावजी यांच्याकडे १५ -२० वकील प्रॅक्टिस करतात, त्यात शर्वरी तुपकर देखील आहेत. गांढेंचे सासरे चव्हाण हे ॲड. सावजी यांच्याकडे काही वर्षे कारकून म्हणून काम पहात होते. त्या ओळखीतून ती केस त्यांच्याकडे आली होती. प्रथमदर्शी हा व्यापारी - व्यापाऱ्यातील व्यावसायिक विषय असल्याचे त्यांना वाटले . मात्र दुसऱ्या दिवशी याबाबतीत खरे काय ते आपल्याला कळल्याने ॲड. सावजी यांना आपण ती केस घेऊ नका अशी विनंती केली. आता संबंधित केस ॲड. व्ही.एन.इंगळे यांच्याकडे असल्याचे तुपकरांनी सांगितले. ॲड. सावजी यांच्याकडे जाणारा पक्षकार मला विचारून जात नाही, तो त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तुम्हाला मला टार्गेट करायचे की शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यायचे हे आधी सांगा, मला टार्गेट करायला आयुष्य पडलेय असे तुपकर यावेळी म्हणाले.
खासदारांचे भाऊ त्यांना विचारून केस घेतात का?
एका घरातील ४ लोक वेगवेगळ्या व्यवसायात काम करीत असतात. भाजप नेते राम जेठमलानी यांच्याकडे अनेक काँग्रेस नेत्यांच्या केसेस होत्या, याचा अर्थ ते त्यावेळी भाजपच्या विरोधात होते असा होत नाही. खासदार जाधवांचे भाऊ देखील वकील आहेत, ते खासदारांना विचारून केसेस घेतात का? असा सवाल तुपकर यांनी यावेळी केला. एवढा शेतकऱ्यांचा पुळका असेल तर तुमचा भाऊ का शेतकऱ्यांची केस घेण्यासाठी पुढे आला नाही? आपले ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे पहायचे वाकून वाकून हे बरं नाही असा टोला यावेळी तुपकरांनी लगावला. रविकांत तुपकर यांची पत्नी शेतकऱ्यांची केस घेईल का असा प्रश्न पत्रकार परिषदेत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विचारला होता, यावर तुपकर म्हणाले की, हो..शेतकऱ्यांनी म्हटले तर माझी पत्नी शेतकऱ्यांची केस घ्यायला तयार आहे, पण खासदारांचे भाऊ शेतकऱ्यांची केस घेतील का ? असा आपला सवाल असल्याचे तुपकर म्हणाले.
ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांची लायकी आहे का?
ज्या नेत्यांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली त्यांची लायकी आहे. दत्ता खरात वर्षाला पक्ष बदलतात, चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या साडेचार कोटींवर त्यांनी डल्ला मारला. शिवाजी देशमुख आणि गाडे यांचे काय संबंध आहेत? गाडे पळून जायच्या आदल्या दिवशी कुणासोबत होता? गाडेला अटक करतांना शिवाजी देशमुख यांनाही अटक करा, त्यांची पोलीस चौकशी करा. दूध का दूध सामने येईल असे तुपकर म्हणाले. रणमोडे प्रकरणात शिवाजी देशमुखांनी पोलीस ठाण्यात जबाब का नोंदविला नाही असा सवाल करीत कमिशन खोरांची माझ्या बाबतीत बोलायची लायकी नाही असा युक्तिवाद तूपकर यांनी केला.
जेव्हा शेतकरी संकटात तेव्हा तुम्ही गुवाहाटीत मजा मारत होते..!
आमदार संजय रायमुलकरांनी देखील काल आपल्याविरोधात पत्रकार परिषद घेतल्याचे सांगत तुपकर म्हणाले की, तुम्ही आमच्या आंदोलनाला नौटंकी म्हणता मग पेनटाकळी प्रकल्पात तुम्ही उडी मारली ती नौटंकी होती का? १५ वर्षे खासदार तुमचे, त्याआधी आमदार तुमचे आता १५ वर्षांपासून तुम्ही आमदार तरी तुम्हाला पेनटाकळी प्रश्न सोडवता आला नाही. जेव्हा अतिवृष्टीने शेतकरी संकटात होता तेव्हा तुम्ही गुवाहाटीत मजा मारत बसले होते. सौ चुहा खाके बिल्ली चली हजको असा हा प्रकार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. एवढा कळवला तुम्हाला शेतकऱ्याबद्दल असेल तर अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्यांना का मिळवून देत नाही? पीक विम्याची रक्कम का मिळवून देत नाही. तुम्ही मला कशाला प्रश्न विचारता, मी आमदार,खासदार नाही. रायमुलकर साहेब उत्तर द्यायची जबाबदारी तुमची आहे असे रविकांत तुपकर म्हणाले.
१० दिवस खासदार झोपले होते का?
शिंदेच्या शिवसेनेचे नेते खासदारांनी एसपींना फोन केल्याने गाडे बंधू विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगतात. मग ज्या दिवशी फोन केला त्या दिवशी का नाही झाला? आम्ही दुसऱ्या दिवशी एसपींना भेटलो त्यानंतर दीडच तासांत गुन्हा दाखल झाला. खासदार साहेब १० दिवस काय झोपले होते का? असा सवाल करीत खासदार साहेब शक्तिमान असतील, तर त्यांनी पीडित शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे असे तूपकर म्हणाले.
मेहकर तालुक्यातील लक्ष द्या..!
मेहकर तालुक्यातील अग्रवाल नावाचा व्यापारी शेतकऱ्यांचे ५ कोटी घेऊन पळून गेला. जेव्हा हे झाले तेव्हा खासदारांचे भाऊ माधवराव जाधव हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. त्या अग्रवाल बरोबर सेटलमेंट च्या बैठका कुणी घेतल्या? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्षा येथील ढवळे नावाच्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी फसवले तेव्हा तुम्ही का आंदोलन केले नाही? शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल झाला नाही या व्यापाऱ्यांना कुणी वाचवले असा प्रश्न तुपकर यांनी खासदार जाधव व आमदार रायमुलकरांना विचारला. माझा आणि गाढे चा कोणताही संबंध नाही. गाढे प्रकरणात जसे खासदार व त्यांची माणसे पुढे पुढे करीत आहेत तसे ढवळे आणि अग्रवाल प्रकरणात देखील करावे. रणमोडे प्रकरणात भूमिपुत्र कुठे होते असा सवालही तुपकर यांनी केला.
त्यांच्या झोपा खराब झाल्या..
भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जिल्ह्यात आले होते. तेव्हा लोकसभा कोअर कमिटीची त्यांनी बैठक घेतली. जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी आम्हाला उमेदवार बदलून द्या अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. हे खासदारांना देखील माहीत झाले असेल, त्यामुळे त्यांच्या झोपा खराब झाल्या आहेत असे तुपकर म्हणाले. आम्ही लोकसभा लढणार असे म्हटल्यामुळे आता आपल्याविरुद्ध हे सुरू झालंय. मी अंगावर येईल त्याला शिंगावर घेणारा माणूस आहे, मी कुणाच्या बापाला भित नाही. ते अंगावर गुंडही पाठवतील..पण मी मरणाला भीत नाही. लोकसभेची धास्ती एवढ्या लवकर घेऊ नका. मला काय चीत पट करायचे ते करा पण शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका असेही तुपकर म्हणाले.