क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन करून रविकांत तुपकरांचा खामगावात निघालेल्या विराट रॅलीत सहभाग!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजन समाजाचे उद्धारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खामगावात आज समाजबांधव व बहुजन समाजाच्या वतीने विराट रॅली काढण्यात आली. यावेळी जनसामान्यांचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी निघालेल्या रॅलीत सहभागी होवून क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन केले.
  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविकांत तुपकर यांनी खामगाव येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर शहरातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीत ते सहभागी झाले. समाज बांधवांना शुभेच्छा देत प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन त्यांनी उत्साह वाढविला. महात्मा फुलेंचे विचार क्रांति घडविणारे आहेत. सत्यशोधकाच्या याच विचारांवर चालून बुलढाणा जिल्ह्यात नवी क्रांती घडविण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा आणि समर्थन पाहता जिल्ह्यात आता निश्चितच परिवर्तन घडणार आहे, असे मत यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.