रविकांत तुपकरांनी घेतली देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळेंची भेट!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २४ नोव्हेंबरच्याच्या मुहूर्तावर राज्य शासन व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत झालेल्या महायशस्वी बैठकीवरच समाधान न मानता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आता केंद्र सरकारकडे मोर्चा वळविला आहे!  लागोपाठ दोन दिवसांत त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र दरबारी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करून केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मागण्या रेटण्यासाठी साकडे घातले. यावर पुढील आठवड्यात वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत बैठक घेऊन मागण्या मार्गी लावण्याचे तर सुप्रियाताईंनी लोकसभेत आवाज बुलंद करण्याची ग्वाही दिली.

अन्‍नत्याग आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांना फोन करून केंद्र सरकारच्या संदर्भात मागण्यांबाबत पुढाकार घेण्याचे आश्वासन देत चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर काल दोघांमध्ये सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यापाठोपाठ आज रविकांत तुपकरांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सोयाबीन- कापूस उत्पादकांसाठी लोकसभेत आवाज उठविण्याची विनंती केली. खा.सुळेंनी तुपकरांकडून पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती समजून घेतली. यावेळी तुपकरांनी केंद्र सरकार संबंधित मागण्या रेटून धरल्या. त्यामध्ये  देशात सोयापेंड आयात करू नये, त्यासंदर्भात तात्काळ आदेश काढणे, सोयापेंडीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे,  खाद्यतेल व पामतेलावरील आयात शुल्क तात्काळ वाढवावे,  कापसावरील आयात शुल्क कमी करू नये, कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, सोयाबीनवरील 5% GST रद्द करावा या मागण्यांचा समावेश आहे. सोयाबीन- कापूस दरवाढीसाठी केंद्रातील धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे व त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती तुपकरांनी फडणवीस व खा.सुळे यांना केली. यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन फडणवीसांनी दिले व या प्रश्नांवर संसदेत आवाज उठविणार असा शब्द खा.सुप्रिया सुळे यांनी तुपकरांना दिला.