रविकांत तुपकरांनी केली संग्रामपूर-शेगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर! म्हणाले, सरकार असंवेदनशील, पालकमंत्र्यांनी पाहणी करणे अपेक्षित होते...

अचानक आलेल्या पूरामुळे अनेक ठिकाणी घरे वाहून गेली आहेत, पशूधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेली तर शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. अनेकांच्या घरात पाणी घुसले, घरांची पडझड झाली. घरातील साहित्य वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी या पूरात वाहून गेली आहे. प्रचंड असे नुकसान झाल्याने लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रविकांत तुपकरांनी या अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. एकलारा येथील मुधकर पांडुरंग धुळे यांचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला. रविकांत तुपकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. ज्यांची घरे वाहून गेली, घरात पाणी शिरल्याने त्यांना शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे अशा नागरिकांशी देखील रविकांत तुपकर यांनी संवाद साधून त्यांना आधार दिला.
यावेळी प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याची विनंती त्यांना केली. नागरिकांशी संवाद साधतांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठे व आक्रमक आंदोलन उभे करण्याचा शब्द रविकांत तुपकरांनी दिला. संग्रामपूर व जळगाव जामोद ही दोन तालुके मिळूण एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यातील १२ हजार २५५ हेक्टर जमिन अक्षरश: खरडून गेली आहे. त्यामुळे शासनाने या सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, नाना पाटील, सुनील अस्वार, दत्ता जेऊघाले, नयन इंगळे, समाधान म्हसुरकार, आशिष सावळे, शेख अस्लम, अमर राहटे, विवेक राऊत, प्रशांत खोडे, योगेश मुरुख, उज्वल खराटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
.. तर रोषाला सामोरे जावे लागेल
नुकसान होवून ४८ तास झाले तरी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी साधी पाहणी सुद्धा केली नाही. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सरकारला या नुकसानग्रस्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.