रविकांत तुपकर हाजीर हो...तुपकरांच्या जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उद्या सुनावणी! तुपकरांना आंदोलनाच्या गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव...

 
बुलडाणा, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून याप्रकरणी उद्या ता.७ फेब्रु. रोजी सुनावणी होणार आहे. उद्या न्यायालयात होणाऱ्या सुनावणी कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान माझ्यावर एकही चुकीचा गुन्हा दाखल नाही, सर्व गुन्हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतांना आंदोलनातील आहे. मी शेतकरी-कष्टकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर मला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला जात आहे. मला एक काय.. दहा वर्षे तुरुंगात टाका पण शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर येऊन लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख असली तरी बुलढाणा शहर पोलिसांनी मात्र रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवलं आहे. तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी बुलढाणा शहर पोलीसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे. तुपकर यांना सराईत आणि गंभीर गुन्हेगार संबोधुन त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली मागणी आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक आहे.  
            सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजवर रस्त्यावर उतरून अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे दोन वर्षांपूर्वी सोयाबीन आणि कापसाला चांगले दर मिळाले आणि शेतकरी सुखावले होते तर गेल्या वर्षी बुलढाण्यातील महामोर्चा आणि मुंबईतील अरबी समुद्रातील जलसमाधी व त्यानंतर केलेल्या आत्मदहन आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिकविमा व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई असे तब्बल ५१७ कोटी रुपये मिळाले हे आंदोलनाचे यश आहे. त्यानंतर यावर्षी देखील रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात भव्य असा एल्गार मोर्चा बुलढाण्यात निघाला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. तेव्हाही पोलिसांनी तुपकरांना अटक केली होती मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांचे मुक्तता केली होती. त्यानंतर रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अन्नत्याग कायम ठेवून त्यांनी हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत धडक दिली होती त्यानंतर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली होती, परंतु त्यानंतरही सरकारने आश्वासन न पाळल्याने नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन केले, त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्याने तुपकरांनी १९ जानेवारी रोजी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु रेल्वेरॊकॊ आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ (३) अन्वये १८-०१-२०२४ रोजी तूपकरांना अटक करून १९-०१-२०२४ रोजी मा.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून पुढील १४ दिवस स्थानबद्ध ठेवण्यास विनंती केली होती. मा.न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची वरील विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशाविरोधात पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांनी सत्र न्यायालय बुलढाणा येथे पुनरनिरीक्षण अर्ज दाखल केला आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांनी (श्री.पी.बी.देशपांडे) यांनी इस्तेगाशा क्र. १/२४ वर ता.१९-०१-२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशास आव्हानित केले आहे. रविकांत तुपकर यांचे विरुद्ध २१ निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. 
 रविकांत तुपकर यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. रविकांत तुपकर हे सराईत गुन्हेगार असून त्यांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रीय सहभाग असतो. तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्यांचे जन जीवन विस्कळीत होत असून जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे त्यांचेवर स्थानबद्धतेची कारवाई योग्य असून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असे पोलिसांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची पहिली तारीख ०१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. न्यायालयात ठेवण्यात आली होती आणि त्याची नोटीस तूपकरांना ०१ फेब्रुवारी दुपारी ०१.३० वा. मिळाली होती . या प्रकरणी उद्या होणाऱ्या सुनावणी कडे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.