अन्नत्याग सुरू ठेऊन उद्या सकाळी हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईकडे होणार रवाना; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकरी घेणार मंत्रालयाचा ताबा;गावागावातील शेतकरी होणार सहभागी!

अन्नत्यागामुळे तुपकरांची प्रकृती खालावली; आंदोलनाला मिळतोय भरभक्कम पाठींबा
 
Bxnfn
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सरकारच्या विरोधात लढा उभारला आहे. आपले अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेऊन हजारो शेतकऱ्यांसह ते मंगळवारी मुंबईकडे कुच करणार आहेत. गावागावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मंत्रालयावर धडक देण्यासाठी सज्ज झाले असून सकाळी शेतकऱ्यांची ही फौज मुंबईकडे रवाना होणार आहे. 
येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रु. भाव मिळवा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० टक्के पिकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी यासह सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार व २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रलयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान पार्श्वभूमिवर बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकरांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली होती तर न्यायालयाने त्यांची अटक कायदाबाह्य ठरवून त्यांची सुटका केली होती. तेव्हापासून तुपकरांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला शेतकरी, शेतमजुरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विविध पक्ष, संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या दिवशीही तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरुच आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.परंतु तरीही आपले अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेऊन दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे मुंबईत मंत्रालयावर धडक देणारच असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला असून त्यानुसार हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन ते २८ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत. 
  Bdnd
या आरपारच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी गावागावातील शेतकरी, शेतमजूर तसेच कार्यकर्ते सज्ज झाले आहे. सरकार आंदोलन दडपडण्याचा प्रयत्न करत असल्याने शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या हक्कासाठी मुंबईत धडक देणारच, असा निर्धार करुन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे कुच करण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता सोमठाणा येथील आंदोलन स्थळावरुन ही फौज बुलडाण्याकडे निघणार आहे. बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईनसमोर सर्व कार्यकर्ते, शेतकरी जमा होणार असून तेथून सकाळी ९ वाजता हे सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. 
तुपकरांची प्रकृती खालावली
रविकांत तुपकर यांनी २५ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून शुगर लेव्हल कमी झाली आहे शिवाय कमालीचा अशक्तपणा जाणवत आहे. परंतु तरीही आपले अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेऊन शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत धडक देण्याच्या निर्णयावर ते ठाम असून मंगळवारी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत.
Hdnd
एकनाथराव खडसे,सदाभाऊ खोत यांच्यासह विविध नेत्यांनी दिला पाठिंबा
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमठाणा येथे आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांच्याशी चर्चा केली. सरकारमध्ये असलो तरी सरकार जमा नाही, असे सांगत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई असल्याने या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सदाभाऊ खोत यांनी यावेळी जाहीर केले. तसेच ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनीही रविकांत तुपकरांशी चर्चा केली असून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासोबतच राहुल बोंद्रे, पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटनांनी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सर्वच स्तरातून मिळत असलेला प्रचंड पाठिंबा पाहता हे आंदोलन व्यापक होणार असल्याचे दिसून येत आहे.