राजू शेट्टींचा रविकांत तुपकरांना पाठिंबा!पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले प्रचाराला लागण्याचे आदेश

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रविकांत तुपकर हे आपले सहकारी असून त्यांच्या प्रचारासाठी 'स्वाभिमानी'चे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील सहकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहेत. त्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र देखील दिले आहे.
Advt
Advt. 👆
रविकांत तुपकर हे गेल्या २२ वर्षांपासून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला व समाजातील सर्व घटकांसाठी अविरतपणे लढा देत आले आहे. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शालेय जिवनापासूनच चळवळीत उडी घेतली होती. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात त्यांनी राज्यभर मोठे संघटन उभे केले असून अनेक आंदोलनात राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लाऊन सहभाग घेत आंदोलने यशस्वी केले आहेत. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यांच्या उमेदवारीला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हातकलंगले, बुलडाणा, सांगली व परभणी या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवित आहेत, तरी राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या चार मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी सूचना वजा विनंती या पत्रातून प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. आपण कोणाशीही आघाडी केलेली नसून आपले चारही उमेदवार स्वतंत्र आहेत, असेही या पत्रात नमुद आहे. स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने यापूर्वीच तुपकरांना पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तर राजू शेट्टी यांनी देखील तुपकरांना पाठिंबा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकदीने प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही शेतकरी संघटनांची ताकद एकत्रीतपणे तुपकरांच्या पाठिशी उभी राहिली आहे. तर दुसरीकडे विविध पक्षातील पदाधिकारी देखील पक्षाचा राजीनामा देऊन उघडपणे रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला भिडले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात सर्वसामान्य नागरिक तुपकरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता अपक्ष असुनही रविकांत तुपकर यांची ताकद वाढली आहे. जनसामान्यांचा उमेदवार म्हणून तुपकरांची हवा संपूर्ण मतदारसंघात झाली आहे. सर्वसामान्यांच्या बळावरच जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई विजयाच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.