राहुल चव्हाणांचा खा.जाधव, संजय कुटेंवर हल्लाबोल! म्हणाले, "या" तालुक्याचा आमदार गद्दारांच्या बॅगा घेऊन पळणारा!

१५ वर्षांत खासदारांनी काय दिवे लावले? जळगाव जामोद मध्ये पार पडला उबाठा शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचा अभ्यास वर्ग !

 
Rahul
जळगाव जामोद: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने बोंब आहे. १५ वर्षे केवळ खुर्चीचा उपभोग घेण्याचे काम खासदार जाधवांनी केले. १५ वर्षे आमदार, १५ वर्षे खासदार, एकदा राज्यमंत्री एवढं मिळून देखील त्यांनी गद्दारी केली. ४० आमदार सुरत आणि गुवाहाटीत मज्जा मारत होते तेव्हा इथले आमदार गद्दारांच्या बॅगा घेऊन पळत होते अशा शब्दात उबाठा शिवसेनेचे बुलडाणा लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांनी खा.प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावर हल्लाबोल केला. जळगाव जामोद मध्ये आज शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचा मेळावा व अभ्यास वर्ग पार पडला यावेळी राहुल चव्हाण बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह ता.प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुखांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राहुल चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीसोबत मिंधे गटाने गद्दारी केली आहे. इथली माती गद्दारांना माफ करीत नाही. इथले आमदार सुरत आणि गुवाहाटीत गद्दारांच्या बॅगा घेऊन पळत होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत गद्दार खासदारांना आणि विधानसभा निवडणुकीत गद्दार आमदारांना जमिनीत गाडण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन राहुल चव्हाण यांनी केले. हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो असे गद्दार सांगतात मग अजित पवारांचे कोणते हिंदुत्व तुम्हाला पटले याचे उत्तर मिंध्यांनी द्यावे असे राहुल चव्हाण म्हणाले. स्थानिक आमदारांवर हल्लाबोल करतांना चव्हाण म्हणाले की, जळगाव जामोद मध्ये विकास नावाला देखील दिसत नाही. वनवासी समाज इथे राहतो म्हणून या समाजाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही राहुल चव्हाण यांनी यावेळी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार आहे ही काळ्या दगडावरची रेख आहे. बूथ प्रमुखांनी आपापल्या बूथ वर लक्ष केंद्रीत करावे, विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी करा असेही राहुल चव्हाण म्हणाले.