बुलडाण्यात आज राडा होणार! "आत्मदहन करू द्या नाहीतर आम्हाला गोळ्या घाला" आंदोलनावर रविकांत तुपकर ठाम! पेट्रोल - डिझेल च्या कॅना घेऊन शेतकरी बुलडाण्याकडे निघाले!

तुपकर अजूनही पोलिसांच्या हाती लागेना; तूपकरांनी वेशांतर केल्याची चर्चा!
शहराला पोलीस छावणीचे स्वरूप

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला पिकविमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई व सोयाबीन कापसाच्या दरवाढी बाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आर -पारची लढाई लढण्याची टोकाची भूमिका घेतली आहे . एकतर आमचे जगणे मान्य करा नाहीतर  आम्हाला आत्मदहन करू द्या अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला.. माझा जीव गेला तर जाऊदेत...आम्ही शहीद व्हायला तयार आहोत ..आता मागे हटणार नाहीच अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली आहे. आज, ११ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबई येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर तुपकर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहेत. दरम्यान प्राप्त माहितीनुसार अनेक शेतकरी पेट्रोल- डिझेल च्या कॅना घेऊन बुलडाणा शहराकडे निघाले आहेत. तुपकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केल्याच्या दिवसापासून ते भूमिगत झाले आहे. मुंबई आणि बुलडाणा पोलिसांची पथके तुपकर यांच्या मागावर असली तरी तुपकर अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी  वेशांतर केल्याची चर्चा रंगली आहे. तुपकर आज थेट आंदोलन स्थळीच प्रकट होण्याची शक्यता आहे.

 बुलडाणा शहराला आज पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कालच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक जयंत नाईकनवरे यांनी बुलडाणा येथे येत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले. एकही अनुचित प्रकार घडणार याची काळजी घ्या, सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवा अशा सूचना जयंत नाईकनवरे यांनी पोलिस विभागाला दिल्याचे कळते. मात्र असे असले तरी जीवावर उदार झालेल्या  हजारो शेतकऱ्यांना आवरता आवरता पोलीस विभागाच्या नाके नऊ येण्याची शक्यता आहे..एकंदरीत रविकांत तुपकर यांनी म्हटल्याप्रमाणे बुलडाण्यात आज राडा होण्याचीच शक्यता आहे.