११ फेब्रुवारीला बुलडाण्यात राडा होणार! शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी फुंकले आंदोलनाचे रणशिंग! म्हणाले, आमचे जगणे मान्य करा, नाहीतर आम्हाला बंदुकीच्या गोळ्या घालून मारा!

 
Tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. १० फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ११ फेब्रुवारीला  बुलडाण्यात राडा होईल. एकतर आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला जगू द्या नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या, तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी आम्हाला ठार करा अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हे आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. आज ७ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची घोषणा केली.

६ नोव्हेंबरला रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यात हजारो शेतकऱ्यांना घेऊन  एल्गार मोर्चा काढला होता.त्यानंतर मुंबईत जलसमाधी आंदोलन करण्यासाठी तुपकर मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तुपकरांना चर्चेला बोलावले होते. सोयाबीन कापूस  दरवाढी संदर्भात केंद्राशी चर्चा करणार असल्याचा शब्द त्यावेळी राज्य सरकारने तुपकर यांना दिला होता. राज्य सरकारशी संबधित काही  मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या होत्या. मात्र त्यानंतर सोयाबीन कापूस  दरवाढीच्या मुद्द्यावर राज्याने केंद्राशी कोणतीही चर्चा केली नाही. सरकारने गोड गोड बोलून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.  सरकार केवळ निवडणुकांचे राजकारण करीत आहे. शेतकरी मेला तरी सरकारला फरक पडत नाही, सरकार टिकवण्यासाठी सरकारची धडपड आहे त्यामुळे आता आम्ही टोकाची भूमिका घेतल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

   
  अजूनही  ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. ७० टक्के शेतकऱ्यांनी अजूनही भाववाढीच्या आशेने सोयाबीन विकली नाही. मात्र सध्याच्या बाजारभावानुसार उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सुतनिर्यातीला प्रोत्साहन द्या, सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन द्या, कापसाचे आयात शुल्क २० टक्के करा, शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करा, पीक विम्याची रक्कम जमा करा अशा आमच्या मागण्या असल्याचेही तुपकर म्हणाले. 
       
असे असणार आंदोलन..!

मागण्या करण्यासाठी रविकांत तुपकर यांनी सरकारला १० फेब्रुवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर ११ फेब्रुवारीला हजारो शेतकरी आत्मदहन करण्यासाठी रस्त्यावर उतरतील. आता माझा जीव द्यायला मी तयार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून  आम्ही आत्मदहन करू तेही सरकारला करू द्यायचे नसेल तर आम्हाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून ठार करा..तुमच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील मात्र आम्हा शेतकऱ्यांच्या छात्या कमी पडणार नाही असेही तुपकर म्हणाले.