धक...धक करने लगा..! भाजपच्या रणनितीने शिंदे गटाच्या खासदारांची धकधक वाढली; तिकीट कापण्याची भीती? भाजपने पहिल्या यादीत स्वतःच्या ३४ खासदारांचेही तिकीट कापले! बुलडाण्याच्या जागेवर भाजपचा दावा..!
Mar 4, 2024, 13:30 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. पुढच्या ४० ते ५० दिवसांच्या आत लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झालेले असेल. सगळेच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत असले तरी भाजपची तयारी जोरात सुरु आहे. "अबकी बार ४०० पार" असा नारा दिलेल्या भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करून पुढचे पाऊल टाकले आहे. पहिल्याच यादीत भाजपने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांसह विद्यमान ३४ खासदारांचे तिकीट कापायला देखील भाजपने मागेपुढे पाहिले नाही, भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत पिछाडीवर दिसलेल्या अनेक मातब्बर खासदारांना भाजपने थांबवले आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील जागा जाहीर केल्या नाहीत, कारण महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भात अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मात्र असे असले तरी भाजपच्या रणनितीने मित्रपक्ष असलेल्या शिंदेगटाच्या खासदारांची धकधक वाढली आहे.
गेल्या वर्षभरापासून भाजपने देशभरातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघात सर्व्हे केले आहेत. त्याच्या आधारावरच भाजप लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करीत आहेत. सर्व्हेत नापास झालेल्या स्वतःच्या ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे भाजपने पहिल्या यादीत कापली आहेत, त्या जागी नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही भाजपने प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे केले आहेत. जिंकून येण्याची क्षमता या आधारावरच महाराष्ट्रात भाजप स्वतःसाठी अनुकूल असलेल्या ३० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. यावेळेस त्यात ५ जागा वाढवण्याचा भाजपचा इरादा असल्याने ज्या ५ जागां शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आहेत मात्र तिथे दोन्ही पक्ष कमकुवत आहे अशा जागा भाजपने हेरल्या आहेत. त्यात बुलडाणा आणि यवतमाळ - वाशिमची जागा शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावण्याचा भाजपचा प्लॅन आहे, कारण भाजपने केलेल्या सर्व्हेत यवतमाळ वाशिमच्या खा.भावना गवळी आणि बुलडाण्याचे खा.जाधव पिछाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या आमदार संजय गायकवाड यांनीदेखील ही बाब कबूल केलेली आहे. भाजपची एकंदरीत रणनीती पाहता शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांना तिकीट कापण्याची भीती आहे.
जागावाटपाचे सुत्र?
भाजपच्या केंद्रीय निवडणूक निर्णय समितीची पुढची बैठक ६ मार्चला आहे. त्या बैठकीनंतर भाजप आणखी काही उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकते. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटावा असा भाजपचा प्रयत्न असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतः ३० जागा लढवून मित्रपक्षांना उर्वरित १८ जागा देईल अशी शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना १० ते ११ तर उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात. शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या १३ खासदार आहेत, अशा स्थितीत शिंदेच्या किमान २ खासदारांचे तिकीट कटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुलडाण्याच्या जागेवर भाजपचा दावा..
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेना नेते खा. प्रतापराव जाधव गत १५ वर्षांपासून इथे खासदार आहेत. मात्र यावेळची निवडणूक त्यांना जड जाणार असल्याचे भाजपचे ठाम मत आहे. अँटीइन्कमबसी चा फटका खा. जाधव यांना बसू शकतो. मित्रपक्ष असलेल्या भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते खा. जाधव यांच्यावर नाराज आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत ५ वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा प्रवास केला, यावेळी भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी खा.जाधव यांच्याबद्दल नाराज असल्याचा एकमुखी स्वर ना.यादव यांच्याजवळ काढत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. ना.यादव यांच्याकडून बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा "आखो देखा अहवाल" भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहचला आहे. एकंदरीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर भाजप ताकदीने दावा सांगत आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटला तर उमेदवार म्हणून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नावाचा विचार भाजपकडून अग्रक्रमाने होऊ शकतो.