धक्का, धक्के अन्‌ धक्कादायक! संग्रामपुरात प्रहारला सत्ता; मोताळ्यात काँग्रेसचे सरकार!! भाजप, वंचितचा सुपडा साफ; नगरपंचायत निकाल

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धोधो मतदान म्हणजे धक्कादायक निकालाची दाट शक्यता हे जिल्ह्यातील दोन नगर पंचायतींच्या निकालाने आज, १९ जानेवारीला पुन्हा सिद्ध झाले. संग्रामपूरमध्ये प्रहार जनशक्ती व संग्रामपूर मित्र मंडळ युतीने १७ पैकी १२ जागा जिंकत प्रस्थपित पक्षांना दे धक्का दिल्याने व भाजपा व वंचित बहुजन आघाडीचा सुपडा साफ झाल्याने तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेसने ४ जागा जिंकत राजकीय प्रतिष्ठा कशीबशी राखली. शिवसेनेला एकमेव जागा मिळवता आल्याने त्यांचे राजकीय वस्त्रहरण टळले! मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला खाते देखील उघडता आले नाही. विविध राजकीय पक्षाच्या ॲक्टिव्ह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मित्र मंडळाने जिद्दीने लढत दिली. प्रहारचे राज्य सचिव गणेश पुरोहित व जिल्हाप्रमुख वैभव नोहिते हे करडी नजर ठेवून होते.

दरम्यान धक्कादायक निकालाची ही सुप्त लाट घाटाखालून मोताळ्यापर्यंतदेखील पोहोचली. तेथील लढतीत काँग्रेसने १२ जागांसह बहुमत मिळवत सत्ता राखली. शिवसेनेने शर्थीची झुंज दिली. जबरदस्त माहौल तयार केला. पण पक्षाला ४ जागांवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. मात्र भाजपा व वंचित बहुजन आघाडीचा सुपडा साफ झाला.

सकाळी दहाला संग्रामपूर व मोताळा तहसीलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. ८ टेबलवर व ३ फेऱ्यांत हे धक्कादायक निकाल लागले. जळगाव  व मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी मतमोजणी सुरळीत पार  पाडली. निकालानंतर प्रहार, युती व काँग्रेसने जंगी जल्लोष केला.