एल्गार महामोर्चाला सुरुवात होण्याआधी होणार पुरुषोत्तम महाराज पाटलांचे कीर्तन! सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वारकरी संघटनांचाही पाठिंबा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या,२० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा होणार आहे. ५ नोव्हेंबरपासून निघालेली एल्गार रथयात्रा उद्या बुलडाण्यात पोहचणार आहे. जिजामाता प्रेक्षागार मैदानातून हा एल्गार महामोर्चा सुरू होणार असून त्यानंतर जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेला रविकांत तुपकर संबोधित करणार आहेत. या एल्गार महामोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, वारकऱ्यांच्या विविध संघटनांचा देखील पाठिंबा या मोर्चाला मिळत आहे. महामोर्चाला सुरुवात होण्याआधी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.
 जिजामाता प्रेक्षागार मैदानात पुरुषोत्तम महाराज पाटील शेतकरी आंदोलकांसमोर प्रबोधनात्मक कीर्तन करणार आहेत.सकाळी साडेअकरा वाजता हा कीर्तनसोहळा होणार आहे. वारकरी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.