पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले,"मी मनोज जरांगेंना नेता मानत नाही......"! आम्ही ३५ वर्षापासून....

 
Manoj jarange
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी आंदोलन प्रणेते मनोज जरांगे यांनी लावून धरलेली आहे. या मागणीसाठी त्यांच्यासोबत असू पण त्यांना नेता मानत नाही असे मत काल १९ नोव्हेंबरला मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडले. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
१६ जानेवारीपासून ॲड. पुरुषोत्तम खेडेकर जनसंवाद दौऱ्यात आहेत. त्या निमित्ताने ते छत्रपती संभाजीनगरात आले होते. ३१ जानेवारीपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात त्यांचा दौरा चालणार आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आम्ही मागील ३५ वर्षांपासून करत आहोत. त्यामुळे जरांगेंच्या मागणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत असू पण त्यांना नेता मानत नाही. मराठा- ओबीसी यांच्यातील संघर्ष टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मराठा-ओबीसी एक झाले पाहिजे ,ही कायमच आमची भूमिका राहिली आहे असे खेडेकर म्हणाले. इतकंच नाही तर दरम्यान त्यांनी संभाजीब्रिग्रेडच्या वतीने हिंगोली आणि बुलढाणा मतदारसंघावर प्रबळ दावा केला. ते म्हणाले की, संभाजी बिग्रेड हा आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही शिवसेना ठाकरे गटाशी युती केलेली असून लोकसभेसाठी चार-पाच जागांची मागणी त्यांच्याकडे केलीये.