Amazon Ad

मोताळ्यात हर्षवर्धन सपकाळांच्या हस्ते प्रा.नरेंद्र खेडेकरांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन! सपकाळ म्हणाले, खेडेकरांचा विजय निश्चित,विरोधकांनी पराभव पचवण्याची तयारी ठेवावी

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या मोताळा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काल,१३ एप्रिल रोजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, काँग्रेसनेत्या जयश्रीताई शेळके यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा.नरेंद्र खेडेकर यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत आता विरोधकांनी पराभव पचविण्याची तयारी करावी असा सल्ला दिला.
 पुढे बोलतांना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराला आता देशातील जनता वैतागली आहे. बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, दरवर्षी १ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले पण फेकू ने दिलेले आश्वासन फेकू निघाले असे ते म्हणाले. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, अराजकतेकडे होत आहे असे सपकाळ म्हणाले. जिल्ह्यात काही परिस्थिती वेगळी नाही, सत्ता एककेंद्री झाली आहे, गुंडगिरी प्रवृत्ती वाढली आहे,यांना लोकप्रतिनिधी म्हणायची देखील लाज वाटते असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे,सगळे नेते एकदिलाने काम करीत आहेत त्यामुळे प्रा.नरेंद्र खेडेकरांचा विजय निश्चित आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आणि काँगेसनेत्या जयश्रीताई शेळके यांचीही भाषणे झाली, त्यांनी प्रा.खेडेकरांच्या विजयासाठी झपाट्याने कामाला भिडण्याचे आवाहन केले.