Amazon Ad

प्रतापराव विजयाचा चौकार मारणारच! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास! चिखलीत जाहीर सभेला केले संबोधित; लोक म्हणाले, गडकरी कामाचं बोलले...

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण आज सुपरहिट ठरले. ना कुणावर टीका ना वाढीव चढीव भपकेबाजी..गडकरी आले अन् कामाचं, मुद्द्याच बोलले अशीच चर्चा या सभेनंतर उपस्थितांमध्ये होतांना दिसली. अतिशय मुद्देसुद दिलेल्या भाषणातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. गडकरी यांनी केंद्राच्या विकास कामांचा पाढा वाचला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी बुलढाण्यातून खासदार प्रतापराव जाधव यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. प्रतापराव जाधव यंदा विजयाचा चौकार मारणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ काल, चिखली येथे महायुतीची अंतिम प्रचार सभा पार पडली. यावेळी मंचावर उमेदवार खा. प्रतापराव जाधव, आ. श्वेताताई महाले, आ. संजय गायकवाड, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलतांना ना.गडकरी म्हणाले की,  देशात परिवर्तन सुरू आहे. त्याला गती देऊन देशाला विश्वगुरू बनवायचे आहे. यासाठी बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बुलढाणा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा  या जिल्ह्यात असल्याने जगाला इतिहास  देणारा हा जिल्हा आहे. त्यानंतर जिल्ह्यात आजवर केलेल्या  रस्ते विकास कामांचा लेखाजोखा सांगताना ते म्हणाले, २०१४ पूर्वी केवळ ६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात होता परंतु त्यांनतर त्यामध्ये दहा पटीने वाढ झाली असून ६००  किलोमीटर  राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात झाला  आहे.  चिखली ते खामगाव  ६५० कोटी, चिखली ते  जालना ८११ कोटी, मेहकर ते चिखली ३२२ कोटी रुपयांचे काम झाले आहे. चिखली हातनी  धाड या रस्त्याचे ९५ टक्के काम झालेले आहे. व धाड भोकरदन मार्गाचे २४० कोटींचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  विशेष म्हणजे नव्याने मागणी झालेल्या मलकापूर बुलढाणा चिखली  मार्गाचे १२०० कोटींचे काम मंजूर झाले असून लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार असल्याची घोषणाही ना. गडकरी यांनी केली. 

  ही देशाचे भवितव्य घडवणारी यंदाची लोकसभेची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश बदलला आहे,   विकसित भारताचे चित्र तयार करण्यासाठी पुन्हा एकदा मोदींना निवडून आणायचे आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभेचा देखील समावेश असेल प्रतापराव जाधव विजयाचा चौकार निश्चित मारणार असल्याचा दावा ना. गडकरी यांनी केला.