प्रतापराव जाधव, रविकांत तुपकर, डॉ. सुकेश झंवर आणी आता संदीप शेळके! बुलडाण्यातील राजकारणात लोकसभेसाठी इच्छुकांचे वेगवेगळ्या तऱ्हेने शक्तीप्रदर्शन!वाचा राजेंद्र घोराडे यांचा विशेष लेख..
बुलडाणा: राजेंद्र घोराडे
लोकसभा,राज्यसभा व राष्ट्रपती या तिघामिळून भारतीय "संसद" बनत असते. लोकसभा खासदार बनण्याकरिता लोकांमधून प्रत्यक्ष निवडणुकीने निवडून यावे लागते, तर राज्यसभा ही मागच्या दाराने म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीने खासदार बनवते. लोकसभा खासदार हा जवळजवळ संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिल्ली दरबारात करत असल्याने "खासदार" हा जिल्ह्यातील सर्वात "खास" माणूस मानला जातो. अशा या सर्व दृष्टीने एका लोकसभा मतदारसंघातील शासकीय व प्रशासकीय ताकदीच्या सर्वोच्च पदाधिकारी असलेल्या पदाची "मोहिनी" सर्व पक्षातील जिल्ह्याच्या सर्वोच्च नेत्यांना लागून असते. पण ही लॉटरी सर्वांनाच लागत नाही,तर यासाठी जिल्ह्याच्या मतदारांच्या नजरेत त्या व्यक्तीचा वकूब खूप मोठा असावा लागतो आणी सात विधानसभा आमदार यांचा कमीत कमी विरोध असावा लागतो..
खा. प्रतापरावं जाधव
सद्या बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात जरी आकडेवारीत शिंदे गट व भा.ज.पा यांचे आमदार संख्येने जास्त दिसत असले तरी वैयक्तिक प्रतापराव जाधव यांचा करिष्मा मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर नाही हे शिवसैनिक ही मान्य करतील, २०१४ व २०१९ या निवडणुकामध्ये जुनी शिवसेना व भाजप एकत्रित होते, व सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढल्या गेल्या व त्याच नावाच्या करिष्म्याच्या आधारे भारतभर जिंकल्या गेल्या. त्यामुळे प्रतापराव जाधव यांना कर्तृत्व दाखवण्याची गरज पडली नाही, "मोदीनामाने" त्यांची नौका आपोआप पार लागली. परंतु सतत १५ वर्ष खासदार राहूनही प्रतापराव जाधव यांनी मेहकर विधानसभा मतदार संघाच्या सीमा कधी ओलांडल्याच नाहीत असा आरोप त्यांच्यावर अनेकदा केला जातो आणी बऱ्याच अंशी त्यात सत्यता असल्याचे नाकारता येणार नाही. काळ बदलत जातो आणी लोकही त्या चेहऱ्याला कंटाळतात त्याचवेळी जर अधिक कार्यक्षम व कर्तृत्व सिद्ध केलेला एखादा नवीन चेहरा लोकांना आपलासा वाटला तर लोकही त्याला भरभरून आशीर्वाद देतात असा सर्वसामान्य अनुभव आहे.असेच काही नवीन चेहरे आता बुलडाणा लोकसभेच्या अवकाशात झळकु लागले आहेत.
रविकांत तुपकर
रविकांत तुपकर हे नाव आता महाराष्ट्रभर शेतकरी नेता म्हणून मागील काही वर्षात प्रसिद्ध झाले आहे. तुपकर बुलडाणा लोकसभेचे खासदार बनण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांचे कार्यकर्ते उघड सांगताना दिसतात. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न ,त्यासाठी त्यांची अनोख्या शैलीतील आंदोलने,सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेला संघर्ष ,कोणतेही राजकीय पाठबळ नसताना एक लढाऊ कार्यकर्ता ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रातील दोन नंबरचा नेता हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण तुपकरांनी महामंडळ अध्यक्षपदाचा लाभ घेतल्यानंतर तूपकर बऱ्याच अंशी बदललेले दिसतात. त्यांच्या कथनी करणी व राहणीमानामध्ये नंतर एक पुढारीपणा दिसून यायला लागला आहे. आताचे तुपकर शेतकरी नेते कमी व पांढऱ्या कपड्यात फिरणारे 'काँग्रेसचे' पुढारी जास्त वाटायला लागलेत. मागील काही वर्षातील त्यांची आंदोलने ही आंदोलने होती की नाही याबाबतच शंका येते, ताकद दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना बुलडाणा बोलावणे,त्यांना पिकांच्या अनैसर्गिक भाववाढीची खात्री देणे,अरबी समुद्रात जाणार जाणार, आत्मदहन करणार करणार, त्यासाठी पोलिसांच्या वेषात एखाद्या चित्रपटात शोभेल अशी एंट्री मारणे ह्या बाबी खूप जास्त अतिशयोक्ती व अतिरंजित वाटायला लागल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचबरोबर त्यांच्या पिकांच्या किंमतवाढीच्या, पिकविमाच्या कोणत्याही आंदोलनाला यश मिळाले अस ठामपणे म्हणता येत नाही. मात्र काहीही असले तरी गावगाड्यात तुपकरांचा मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे तुपकर हे बुलडाणा लोकसभेचा चेहरा म्हणून समोर येत आहेत.
डॉ. सुकेश झवर
डॉ.सुकेश झवर हे बुलडाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत, बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक श्री राधेशामजी चांडक यांचे ते जावई.. पण बुलडाणा अर्बन बँकेचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने बुलडाणा अर्बन बँकेला आशियातील सहकारी बँकेच्या शिखरावरती विराजमान केले ही बाब बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या राजकारण्यांनी केंद्रीय सहकारी बँकेची केलेली अवस्था व त्या केंद्रीय सहकारी बँकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेची प्रगती या दोन्हीच्या अवस्थेत एवढा फरक का आहे? तर माणसांचा दर्जा वेगळा असला की प्रगतीमधे किती फरक असू शकतो हे बुलडाणा अर्बन च्या प्रगतीमधून दिसून येत आहे. असे हे डॉ. झंवर लोकसभेसाठी खरोखर उत्सुक आहेत की नाही याबाबत प्रमाण माहिती नाही.. परंतु मा. भाईजी यांचे नितीनजी गडकरी यांचेशी असणारे सख्य, विखे पाटील देवेंद्र फडणवीस यांचे भाईजी व परिवारासोबत असलेले संबंध याचा अर्थ राजकीय घ्यायला हरकत नाही. तसेंच डॉ झंवर ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या वैचारिक, सांस्कृतिक व सामाजिक बाबीमध्ये उत्सुकता घेत आहेत त्यावरून कयास काढायला हरकत नाही. या उलट असे म्हणता येईल की जर एवढ्या कार्यक्षम व कर्तृत्ववान माणसाने जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला तर संघटन , सहकार व वित्तीय बाबीमधील या दिग्गज् व्यक्तीच्या ज्ञानाने , बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाऊ शकतो.डॉ झंवर यांच्याविषयी नकारात्मक समजल्या जाणाऱ्या बाबी अद्याप कानावर नाहीत हिच मोठी सकारात्मक बाब आहे. काँग्रेस मधिल "शशी थरूर" यांचेशी बुद्धीमत्ता, व शैक्षणिक,सांस्कृतिक, वैचारिक व वित्तीय जान याबाबतीत बरेचशे साधर्म असलेला हा माणूस जर खरोखर राजकारणात उतरला तर बुलडाण्याचे "तिरूनंतपुरम" करण्याची क्षमता निश्चितच या व्यक्तीकडे आहे.आणी मुळातच 'कुबेर' असल्याने पैशापायी नीतिमत्ता गहाण ठेवण्याची गरज नसल्याने डॉ. झंवर बुलडाणा जिल्हा राजकारणात एक आदर्श म्हणून उदयास येऊ शकतात.शांत, सुस्वभावी व कर्मचाऱ्यांशी मित्रतुल्य असलेले, सामाजिक व आध्यात्मिक बाबींचा सखोल अभ्यास असलेले डॉ. झंवर राजकीय पदार्पणाला गांभीर्याने घेतील का?
संदीप शेळके
संदीप शेळके हे नाव बुलडाणा जिल्ह्यासाठी अल्पावधीतच चिरपरिचित झाले आहे. राजर्षी शाहूपरिवाराच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये स्व. श्री भास्करराव शिंगणे,व श्री राधेशामजी चांडक यांच्यानंतर आपला ठसा उमटविण्यात संदीप शेळके यांना यश मिळाले आहे . मागच्या काही वर्षांपासून कुक्कुटपालन,आणी अंडी व्यवसाय करणाऱ्या अनेकांना त्यांनी बँक कर्ज व इतर प्रकारे रोजगार मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. राजर्षी शाहू बँकेच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक कुटुंबाना रोजगार पुरविला आहे.त्यांचे बंधू श्री सुनील शेळके हे प्रशासनामध्ये चांगल्या पदावर होते त्यांनीही आता नोकरीचा राजीनामा देऊन अभिता लँड सोलुशन्स नावाने रिअल इस्टेट व्यवसाय सुरु केला आहे. सुनील शेळके नुकतेच चित्रपट व्यवसायातही उतरत आहेत. त्यांच्या वहिनी श्रीमती जयश्रीताई ह्या एक उत्कृष्ठ वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार इथपर्यंत त्यांचा प्रवास वाखानन्याजोगा आहे. स्वतः संदीप शेळके यांनी त्यांची अधिकृत फेसबुक पेजवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर करित सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.या व्हिडिओत " बुलडाणा जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी, जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर नेण्यासाठी "वन बुलडाणा मिशन" सुरु करण्यासाठी संदीप शेळके निमंत्रित करताना दिसत आहेत. सोबत त्यांनी भारतीय संसदेचा फोटो लावला आहे त्यावरून संदीप दादा लोकसभेसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. नवीन नेतृत्व, तरुण नेतृत्व विकासासाठी पुढे येत असेल तर त्यांच्या प्रवेशासाठी आपण सर्वांनी पक्षविरहित शुभेच्छा द्यायला हव्यात.पण ही खरोखर त्यांच्या सक्रिय राजकारणाची नांदी आहे की फक्त चाचपणी आहे ? यावर त्यांनी लवकर व्यक्त होणे गरजेचे आहे. फक्त सहकारातून राजकारणात येण्याअगोदर त्यांनी भाईजी सारख्या जेष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन जरूर घ्यावे कारण सहकार व राजकारण या भिन्न बाबी आहेत....
(लेखात व्यक्त करण्यात आलेली मते ही लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.)