राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळावरील वीजपुरवठा खंडित; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, प्रशासनाला लाज कशी वाटत नाही...

 
miter

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता  जिजाऊ माँ साहेबांच्या  जन्मगृहातील वीज पुरवठा खंडित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून हा वीज पुरवठा खंडित आहे, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले असून २४  तासांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्हाला काय करायचं ते आम्ही करू असं त्यांनी म्हटलं आहे.  एवढं अक्षम्य दुर्लक्ष करतांना प्रशासनाला लाज कशी वाटत नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विकासासाठी शासनाने विशेष कृती आराखडा हाती घेतला आहे. असे असताना २० दिवसांपासून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या राजवाड्यातील जिजाऊ  जन्मगृहातील वीजपुरवठा खंडित आहे.याशिवाय प्रशासनाने स्थापित केलेली सिसीटीव्ही यंत्रणा देखील एका वर्षापासून बंद असल्याची बाब माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाचे  दुर्लक्ष संतापजनक आहे, २४ तासांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी निवेदनातून म्हटले आहे.राजवाडा परिसरातील इतर बाबींकडे सुद्धा लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.