ग्रामपंचायतींच्या 'ओबीसीमुक्त' जागांसाठीही 18 जानेवारीला मतदान! 19 ला ठरणार सदस्य

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेल्या 10 ग्रामपंचायतींच्या ओबीसीमुक्त जागांसाठी देखील 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे. नगरपंचायतीसोबतच या मतदानाची मोजणी 19 जानेवारीला होऊन निकाल जाहीर होणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींच्या 166 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रारंभी ओबीसी वगळता उर्वरित जागांच्या निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले. नंतर ओबीसी आरक्षणच रद्द ठरवून या जागा सर्वसाधारण म्हणून घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता 11 ग्रामपंचायतींच्या 11 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान नामांकन प्रक्रिया पार पडल्यावर 4 जानेवारीला अर्जांची छाननी करण्यात येईल. 6 जानेवारीला दुपारी 3 पर्यंत माघार घेता येणार असून, त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 18 जानेवारीला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेदरम्यान होणाऱ्या मतदानाची 19 जानेवारीला मोजणी करून निकाल जाहीर होईल.

या आहेत ग्रामपंचायती...
निवडणूक पूर्वी ओबीसींसाठी आरक्षित झालेल्या, मात्र नंतरच्या धक्कादायक घडामोडीत ओपन झालेल्या ग्रामपंचायतींच्या 11 जागांचा तपशील असा ः सोनाटी, नायगाव देशमुख (ता. मेहकर), महिमळ, मुरादपूर (ता. चिखली), काळेगाव, पिंपळगाव बुद्रूक (ता. मलकापूर), झोडगा, निपाणा (ता. खामगाव), पळसखेड (ता. लोणार), निमगाव (ता. नांदुरा), पहुरजीरा (ता. शेगाव). पोटनिवडणूक असली या खुल्या असल्याने कोणत्याही प्रवर्गातील नागरिक निवडणूक लढवू शकतो. तसेच आरक्षणाचा राजकीय हक्क हिरावला गेल्याने ओबीसी बांधवांत तीव्र असंतोष निर्माण झाल्याने लढती जिद्दीने लढल्या जातील. तसेच उमेदवारांची संख्याही लक्षणीय राहील असा अंदाज आहे.