कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून राजकारण पेटले! प्रशासकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ!
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आरोप;म्हणाले, अन्यथा सोमवारी घेराव आंदोलन करणार! जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
देशात सध्या सगळीकडे हुकूमशाही सुरू आहे. दिल्लीतले लोन आता गल्लीत देखील पसरले असून लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न सत्ताधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत. विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. कोणतीही थकबाकी नसतांना देखील नोड्युल देण्यात आले नाही व्यापारी, हमाल मापारी मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्याच्या लायसन्स चे नूतनीकरण करून देण्यास सुद्धा अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. आम्ही सातत्याने तशी निवेदने दिली, त्यांना ईमेल देखील केले मात्र विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्याचा डावच सत्ताधाऱ्यांचा दबावाखाली अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप राहुल बोंद्रेंनी केलाय. याचा आम्ही निषेध करतो, अधिकाऱ्यांचे हे आडमुठे धोरण सुरूच राहिले तर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला घेराव घालणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक व सचिवांची प्रतिक्रिया घेतली असता असा कोणताही प्रकार नाही, सर्व काही प्रशासकीय नियमानुसार सुरू असल्याचे सांगण्यात आले.