POLITICAL SPECIAL माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच राजकीय भविष्य असुरक्षित? ज्या मुद्द्यामुळे घेतली होती एकनाथ शिंदेची बाजु आता पुन्हा "तेच" झालं..

 
Bdnxb
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्यावर्षीचा जुन - जुलै महिना राज्यात राजकीय भूकंपाचा ठरला होता..सामान्य जनतेसाठी तेव्हा घडल ते सगळ अनपेक्षित होतं.. महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे दोन भाग होतील अन् त्यातील एक गट बाहेर पडेल हे असं कुणालाही वाटल नव्हत.. पण जे वाटतं नाही ते होत त्यालाच तर राजकारण म्हणतात राव..बुलडाणा जिल्ह्यातील, १ खासदार, २ आमदार, १ माजी आमदार यांनीही एकनाथ शिंदेची साथ द्यायचा निर्णय घेतला..यासाठी प्रत्येक पुढाऱ्याची त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील समीकरण होती.. महाविकास आघाडीत राहून पुढील निवडणुकीत वांधे होतील असं ज्यांना ज्यांना वाटल त्यांनी जुना मित्र असलेल्या भाजपसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदेंची साथ द्यायचा निर्णय घेतला. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर हे त्यापैकीच एक..
 डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली अन् त्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढणारे शशिकांत खेडेकर ६४,२०३ मते घेऊन आमदार झाले. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळेच पक्ष वेगवेगळे लढले होते. विशेष म्हणजे भाजपच्या डॉ. गणेश मांटेंनी या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची ४५,३४९ मते घेतली होती. राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची ३७,१६१ एवढी मते मिळाली होती. त्यावेळी मनसेत असलेले विनोद वाघ १३,५३३ मते घेत चौथ्या तर पाचव्या क्रमांकावरील काँग्रेसच्या प्रदीप नागरेंना ७२६१ मते मिळाली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पुन्हा एन्ट्री झाली अन् शशिकांत खेडेकर यांचा खेळ पांगला. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना भाजपने वेगवेगळे लढून दोन्ही पक्ष मिळून १ लाख ९ हजार ५५२ मते घेतली होती मात्र २०१९ ला एकत्रित लढून देखील खेडेकर यांना ७२ हजार ७६३ एवढीच मते मिळाली. 
तिकडे त्यांचं ठरल अन् इकडे वांधे झाले..
  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून शिवसेना भाजपात वाद झाले. शरद पवारांच्या पुढाकारातून काँग्रेस ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. शशिकांत खेडेकरांचा पराभव करून आमदार झालेल्या डॉ.राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली, ते जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.यानंतर अडीच वर्षे सिंदखेड राजा मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते सत्ताधारी गटात होते. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढल्या निवडणुका देखील महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू अशा घोषणा महाविकास आघाडीचे नेते वरिष्ठ पातळीवर करीत होते, त्यामुळे शशिकांत खेडेकर यांचे टेन्शन वाढणे स्वाभाविक होते. अधूनमधून शशिकांत खेडेकर मंत्री असलेल्या राजेंद्र शिंगणेंवर टीकाही करायचे..एकंदरीत त्या काळात ते राजकीय दृष्ट्या भविष्याच्या चिंतेमुळे अस्वस्थ होते.खरचं महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका झाल्या तर विद्यमान आमदार अन् मंत्री म्हणून डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकरिता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ सुटेल, तेव्हा आपले काय? अशी अस्वस्थ करणारी भीती त्यांना नक्कीच वाटत असावी..
अन् मोकळा श्वास घेतला..
दरम्यान गेल्यावर्षी जुन - जुलै महिन्यात एकनाथ शिंदेच्या उठावानंतर डॉ.शशिकांत खेडेकरांना वाट सापडली.खासदार जाधवांनी शिंदेची बाजु घेण्याआधीच शशिकांत खेडेकरांनी आपला निर्णय घेऊन टाकला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेची साथ असं ते भाषणातून अनेकदा सांगत असले तरी खरं मुख्य कारण काय हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आगामी २०२४ च्या निवडणुकीतील राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हाच त्यामागचा उद्देश होता. अडीच वर्षे कोंडीत घालवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर डॉ.शशिकांत खेडेकरांनी मोकळा श्वास घेतला. गत वर्षभरात चांगल्याच जोमात ते सिंदखेडराजा मतदारसंघात वावरतांना दिसले,विरोधात असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर बरसतांनाही दिसले..
आता पुन्हा असुरक्षित?
दरम्यान शशिकांत खेडेकर यांचा आनंद हा केवळ वर्षभर टिकला..त्यांच्या आनंदाला पुन्हा ग्रहण लागले. वरच्या पातळीवर राज्याच्या विकासासाठी(?) सेटलमेंट झाली अन् राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यात डॉ.शिंगणे न दिसल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना हायसे वाटले असावे. मात्र काही दिवसांत डॉ.राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेच्या मदतीच्या मुद्द्यावरून अजित पवार गटात सहभागी झाले. आता तर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांकडे आहे, पर्यायाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासाची दोर दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून डॉ.शिंगणे यांच्याकडेच आली आहे. "येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढू , आमची युती अभ्येद आहे." अशा घोषणा आता शिंदे - फडणवीस - पवार यांच्याकडून होत आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले आमदार डॉ. शिंगणे आणि डॉ.शशिकांत खेडेकर आता पुन्हा एकदा सत्ताधारी गटात आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा डॉ. खेडेकरांना राजकीय दृष्ट्या हा अस्वस्थ करणारा काळ आहे. ज्या मुद्द्यामुळे एकनाथ शिंदेंची साथ द्यायचा निर्णय घेतला आता पुन्हा तेच झालं अशी त्यांची स्थिती झाली आहे. डॉ. खेडेकरांच्या वरिष्ठांनी सध्या आहे ती युती टिकवण्यावर भर दिला तर मात्र पुन्हा एकदा डॉ. शशिकांत खेडेकरांचे राजकीय भविष्य काय असा प्रश्न त्यांच्या हितचिंतकांना पडणे स्वाभाविक आहे...!