BIG BREAKING जिल्हयात राजकीय भूकंप; मोताळा, बुलडाणा तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे!

बुलडाणा लोकसभा काँग्रेसला न मिळाल्यास निष्क्रिय उमेदवाराचे काम न करण्याचा इशारा...
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असताना दररोज नवनवीन राजकीय भूकंप होत आहेत. महाविकास आघाडीकडून उबाठा गटाने या मतदारसंघावर दावा सांगितलेला असतांनाच काँग्रेसनेही हा मतदार संघ मागितला आहे. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज, २२ मार्चला बुलडाणा आणि मोताळा तालुक्यातील काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई चाटे, मोताळा तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे जे राजीनामे देण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे, गत ३ लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा या मतदारसंघांमध्ये पराभव झाला आहे. त्याआधी सर्वाधिक काळ या मतदारासंघावर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, त्यामुळे २०२४ ला लोकसभा निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आम्ही महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाच्या निष्क्रिय उमेदवाराचा प्रचार करणार नाही असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षाला बुलडाणा लोकसभेची जागा न सुटल्यास आमचे सामूहिक राजीनामे समजून घ्यावे असेही राजीनामा पत्राच्या शेवटी म्हटले आहे.