Amazon Ad

BREKING रविकांत तुपकर यांना पोलिसांनी पुरवली सुरक्षा! आमदार गायकवाडांनी दिली होती शिकार करण्याची धमकी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आजपासून पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलीच धडकी भरवली होती. तुपकर यांनी थेट खासदार जाधव यांनाच टीकेचे लक्ष्य केल्याने आमदार संजय गायकवाड यांनी तुपकर यांना शिकार करण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर तुपकर यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असल्याने राज्याच्या गृहमंत्रालयाने तुपकर यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना दिले, जिल्हा पोलिसांनी तातडीने आदेशाची अंमलबजावणी करीत तुपकर यांना बंदुकधारी पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी फेसबुक लाइव्ह करीत रविकांत तुपकर यांची शिकार करण्याची धमकी दिली होती. यामुळे शेतकरी व तुपकर समर्थक कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांचा निषेध नोंदवला होता, शिवाय राज्यभरातून आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली होती. याआधी देखील तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती, तुपकर यांची  दिवसेंदिवस वाढतच चाललेली लोकप्रियता पाहता तुपकर यांच्या जीवाला धोका असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी तुपकर यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.