रविकांत तुपकरांसह २५ जणांना घेऊन पोलीस अकोल्याकडे रवाना! जामीन मंजूर होईपर्यंत अकोला कारागृहात काढावे लागणार दिवस..!

 
htdg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल,११ फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांच्यासह २५ आंदोलकांना अटक केली होती. आज पहाटे त्यांना चिखलीच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर आज,साडेतीनच्या सुमारास त्यांच्यासह २५ साथीदारांना कडेकोट बंदोबस्तात बुलडाणा व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने तुपकर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.

बुलडाणा जिल्हा कारागृहात ठेवण्याऐवजी तुपकर व त्यांच्या साथीदारांना अकोला येथे नेण्यात येत आहे. त्यामुळे जामीन मंजूर होईपर्यंत पुढील काही दिवस रविकांत तुपकर यांना  कारागृहात रहावे लागणार आहे. तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे तुपकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तुपकर व त्यांच्या साथीदारांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात अकोल्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.