रविकांत तुपकरांच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढला! तुपकर मात्र सापडेना! बुलडाणा, मुंबई पोलिसांची पथके तुपकरांच्या मागावर! उद्याचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

 
Poli
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे उद्या ११ फेब्रुवारीला होणारे आंदोलन चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे. सोयाबीन ,कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या, तेही करू देणार नसाल पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे. उद्या ११ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईच्या एआयसी पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्याची घोषणा तुपकरांनी केली आहे. दरम्यान तुपकर यांनी केलेल्या या घोषणेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली असली तरी तुपकर मात्र गेल्या ४ दिवसापासून भूमिगत झाले आहे. मुंबई आणि बुलडाणा पोलीस तुपकरांच्या मागावर असले तरी तुपकर यांचा पत्ता मात्र अजूनही पोलिसांना लागलेला नाही. बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त तैनात केला आहे.

  उद्या हजारो शेतकरी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे.  स्वतः रविकांत तुपकर नेमके कुठे आंदोलन करणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. उद्या सकाळी ११ वाजता तुपकर थेट आंदोलनाच्या ठिकाणीच प्रकट होण्याची शक्यता आहे. हजारोंच्या संख्येतील शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्यासाठी पेट्रोल - डिझेल च्या कॅन सोबत आणल्या तर प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागेल. एकूणच उद्याचे आंदोलन चांगलेच चिघळण्याची शक्यता असल्याने सगळ्यांचे लक्ष आंदोलनाकडे लागून आहे.