नुकसानीचे पंचनामे करुन शंभर टक्के भरपाई द्या; रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 
tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिछा सोडायला नाही. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांची, गोठ्यांची पडझड झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करुन शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
 

  बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मका, कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे उडाली, घरांची पडझड झाली तर अनेकाच्या शेतातील गोठ्यांचीही पडझड झाली आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी कोलमडून पडला आहे. याआधी खरीप हंगामात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे तर रब्बी हंगामातही अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मोठी अपेक्षा होती परंतु खरीप आणि रब्बीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. खरीप हंगामातील मंजूर असलेली नुकसान भरपाई अजूनही हजारो शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच सातत्याने होत असलेल्या निसर्गाच्या कहरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, ही सर्व बिकट परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांप्रति संवेदनशील होऊन झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.