पक्ष नेत्यांचे आदेश; आमदार राजेश एकडे मुंबईत ! म्हणाले मी तर काँग्रेस सोबतच

 
मलकापूर
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्याने खळबळ उडालेल्या काँग्रेसने सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक बोलाविली आहे. उध्या गुरुवारी सुद्धा बैठक राहण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार राजेश एकडे मुंबईत दाखल झाले आहे.

 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे काँगेसचे आमदार राजेश एकडे यांनी याला दुजोरा दिला आहे. आपण आज बुधवारी ( दि १४) मुंबईत दाखल झालो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपण राजधानीत आल्याचे आमदार एकडे म्हणाले. आज बुधवारी( दि १४) ला संध्याकाळी आयोजित काँग्रेस पक्षाच्या तातडीच्या बैठकीला हजर राहणार असल्याची माहितीही आमदार एकडे यांनी दिली. 

 आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष सोडण्याचा काही प्रश्नच उद्भभवत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आज अशोक चव्हाण यांनीही बैठक बोलविल्याची चर्चा आहे, मात्र मी पक्षासोबतच राहणार आहे. आज संध्याकाळी आयोजित पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगून काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट 
केले.
मी नवीनच, जास्त बोलणे अयोग्य...
 दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पक्षत्यागाचा निर्णय अनपेक्षित आहे. ते हा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. मात्र आपण पहिल्यांदाच आमदार झालो असल्यान याप्रकरणी जास्त बोलणे योग्य राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार एकडे यांनी दिली.
    काँग्रेसने आपल्याला मलकापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, आपण काँग्रेसमुळे आमदार झालो. त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.