मेरी माटी, मेरा देश' कार्यक्रमात सहभागी व्हा; आ. श्वेताताईंचे आवाहन! वाचा कसे आहे कार्यक्रमाचे स्वरूप..!

 
mla sweta tai

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या देशाच्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'आझादी का अमृतमहोत्सव' कार्यक्रमाच्या धर्तीवर 'मेरी मिट्टी मेरा देश' हे अभियान महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गावागावात राबवण्यात येत आहे. देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

परकीय इंग्रजी राजवटीच्या जोखडातून मुक्त होऊन भारताला ७५ वर्षे पूर्ण झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान व करणाऱ्या असंख्य अनाम वीरांच्या व सत्याग्रही आणि बलिदानींच्या स्मृती चिरंतन रहाव्या व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने चिखली मतदारसंघातही या कार्यक्रमाचे शासकीय पातळीवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, विविध स्वयंसेवी संस्था, संघटना व मंडळांच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणजे प्रत्येक गावातील माती एकत्र करून तालुका जिल्हा, राज्य व देशाची राजधानी दिल्ली येथे माती एकत्र करण्यात येणार आहे. गावाच्या पवित्र ठिकाणची माती कळशामध्ये घेऊन १५ ऑगस्ट रोजी गावातून तर १७ ऑगस्ट रोजी चिखली येथे तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या मातीची मिरवणुकीत काढण्यात येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या कलश शोभायात्रेत शासकीय अधिकारी कर्मचारी, सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, तथा ईतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.                    

असे आहे उपक्रमाचे स्वरूप

 'मेरा देश मेरी माटी' या अभियानाअंतर्गत शिलालेख, माती कलशामध्ये गोळा करणे, वसुधा वंदन, ध्वजारोहन, पंचप्राण शपथ व स्वातंत्र्य सैनिक तथा वीरांना वंदन, अशा विविध कार्यक्रमांपैकी कोणत्याही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. 'मेरा देश मेरी माटी' या अभियानात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होणार असुन उपक्रमांसाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

शहीदांच्या नावांचा लागणार शिलालेख

गावातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत, अशा ठिकाणी शिलालेख उभारावा. त्यावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा विजन २०४७ संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, नावे उपलब्ध नसल्यास 'मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव याच्या रक्षणाकरीता बलिदान दिलेल्या वीरांना शतशः नमन' असे सामान्य वाक्य तसेच ग्रामपंचायतचे नाव, दिनांक याबाबी नमूद कराव्यात. या शिलाफलकाची निर्मिती मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी. येथे वृक्षारोपण कार्यक्रम करून त्याचा खर्च मनरेगातून करावा, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले, निवृत्त वीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्याचे आवाहन आ. महाले यांनी केले आहे.