बुलडाणेकरांच प्रेम पाहून भारावलो! पदवीधरांचा विश्वास सार्थ ठरवेल; बुलडाण्यात जाहीर सत्काराला उत्तर देताना आमदार धिरज लिंगाडेंचे प्रतिपादन!

 
Lingade
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराने,जिल्ह्याने मला भरभरुन प्रेम दिलं आहे. ५ जिल्ह्यांचा मतदारसंघ असल्याने विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उर्वरित ४ जिल्ह्यात जास्त वेळ दिला. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जिल्हा पिंजून काढला. या सगळ्यां प्रयत्नांना यश मिळाले आणि निवडणुकीत विजय झाला. हा विजय केवळ माझा नाही तर समस्त पदवीधरांचा आहे, बुलडाणेकरांचा आहे. विजयासाठी आणि विजयानंतर बुलडाणेकरांनी जे प्रेम दिले त्याने मी भारावून गेलो आहे. पदवीधर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. निवडणुकी दरम्यान जे वचन मतदारांना दिले ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे प्रतिपादन विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार धिरज लिंगाडे यांनी केले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज,४ फेब्रुवारीला त्यांचे बुलडाणा शहरात आगमन झाले, जंगी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर स्थानिक गांधी भवनात महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना लिंगाडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंचावर आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.राजेश एकडे, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवंत, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, आशिष रहाटे, संजय राठोड, विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Lingadeभाजप उमेदवारांचे तगडे आव्हान होते. त्यांची उमेदवारी आधीच जाहीर झालेली होती. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजप उमेदवारांकडे भरपूर वेळ होता, तो वेळ आपल्याकडे नव्हता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आ. डॉ. शिंगणे साहेबांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली. उर्वरित चार जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे नेते प्रचारासाठी झटले त्यामुळे आपला विजय झाल्याचे आमदार लिंगाडे म्हणाले.

  माजी मंत्री आ. डॉ शिंगणे म्हणाले की,

विदर्भाचा, अमरावती विभागाचा ,बुलडाणा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी सुशिक्षित मतदारांनी लिंगाडे यांच्यावर सोपवली आहे. विधानपरिषदेत आमदारांची संख्या कमी असल्याने विषय मांडण्याची संधी अधिक मिळते. बी. टी देशमुखांनी ज्या प्रमाणे पदवीधरांच्या प्रश्नांना वाचा फोडली तोच वारसा धिरज लिंगाडे पुढे नेतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस  जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी धिरज लिंगाडे यांच्यामुळे काँग्रेसची व महविकास आघाडीची ताकद वाढल्याचे सांगितले. यावेळी बोंद्रे यांनी धिरज लिंगाडे यांच्या प्रचारासाठी मदत करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ बोलतांना म्हणाले की, आमदार कसा असावा आणि आमदार कसा नसावा असे दोन्ही आमदार बुलडाणा शहरात पहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशीच एकजूट आगामी निवडणुकांत सुद्धा दिसणार असल्याचे ते म्हणाले. सुत्रसंचालन सुनील सपकाळ यांनी तर आभार सुनील आंबेकर यांनी मानले.