खुल्या प्रवर्गातील उमेदवारला २५ हजार तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला भरावे लागणार साडेबारा हजार रुपये डिपॉझिट! उद्यापासून भरता येणार अर्ज..

 
जीसीम
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या टप्प्यात) २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उद्या २८ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये एकूण १९६२ निवडणूक केंद्र आहेत. 
 इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे, यानंतर अर्ज भरल्यानंतर प्रिंट घेऊन त्यासोबत सर्व आवश्यक ते कागदपत्रे प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करायाचे आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांसाठी २५ हजार व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२,५०० इतकी रोख रक्कम नामांकन अर्जासह भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीचा अर्ज suvidha.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना विविध परवानगी मिळवण्यासाठी सुविधा (suvidha) हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवार एकाच ठिकाणाहून नामनिर्देशन , सभास्थळ, लाऊड स्पीकर आदींच्या परवानग्या मिळवू शकणार आहे. निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही अनुचित प्रकारामुळे किंवा नजरचुकीने आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.