चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी १५३ जणांचा मेळ काही जमला नाही!

नेत्यांनी "दुसरीकडे जमवून द्यायचा" दिला शब्द! आता १८ जागांसाठी ५० रिंगणात! आमदार श्वेताताई आणि राहुल बोंद्रे आमने सामने

 
bajar samiti chikhali
चिखली(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत ११ माजी संचालकांचे अर्ज अपात्र घोषित झाल्यानंतर चिखलीचे राजकारण चांगलेच पेटले. तोच वणवा आता निवडणुकीच्या निकलापर्यंत धगधगत राहणार आहे. आज, २० एप्रिलला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १५३ जणांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात उरले आहेत.
 

gode

                                                                                                     ( जाहिरात )

भाजपा आणि महाविकास आघाडी असा सरळ सरळ सामना या निवडणुकीत होतांना दिसत असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना,मनसे लढवत असलेल्या काही जागाही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. २०३ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रकियेनंतर पात्र ठरले होते. त्याआधी ११ माजी संचालकांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र घोषित करण्यात आले होते. २०३ पैकी १५३ जणांचा मेळ काही जमला नाही. पक्षाच्या नेत्यांनी त्यांना माघार घ्यायला लावली. सगळ्यांना आपण पॅनल मध्ये स्थान देऊ शकत नसल्याचे नेत्यांनी गोड गोड बोलून पटवून द्यायचा प्रयत्न केला. काहींना तुमचे "दुसरीकडे कुठेतरी जमवून देऊ" असाही शब्द देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
    
 भाजपच्या वतीने पहिल्यांदा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोर लावल्या जातोय. भाजपच्या विरोधात आतापर्यंत अधिकाधिक काळ सत्ता भोगणारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वातील काँग्रेस आहे. राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना पॅनल मध्ये सामावून घेतांना चांगलीच कसरत राहुल बोंद्रेंना करावी लागली. इतर पक्षांना स्थान देण्यासाठी जवळच्या उमेदवारांना नाईलाजाने उमेदवारी मागे घ्यायला त्यांना सांगावे लागले. दुसरीकडे  आमदार श्वेताताई सध्या जपानच्या दौऱ्यावर असल्या तरी तिकडच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा त्यांची नजर चिखलीच्या बाजार समितीवर आहे. कुणाचे अर्ज कायम ठेवायचे, कुणाला माघार घ्यायला लावायची याकडे त्यांनी लक्ष दिले असेलच.  चिखलीच्या कृषी उत्पन्न  बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या अवकाळीचे हवामान असले तरी राजकारणाचे तापमान मात्र वाढणार आहे.