अधिकाऱ्यांनो आता तुम्हाला राजकीय दबावापुढे झुकावेच लागणार!; जिल्ह्यात गेला संदेश!!; शेगावमध्ये मुख्याधिकारी हरणार, काँग्रेस जिंकणार

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आता अधिकाऱ्यांना राजकीय नेत्‍यांशी जुळवून घेण्याची जणू सक्‍ती व्हावी... असे चित्र शेगावमध्ये निर्माण झाले आहे. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी काँग्रेसकडून वाढलेला दबाव अखेर फलद्रुप होण्याची चिन्‍हे असून, नगरविकास आणि महसूलमंत्र्यांनी "ठोस' आश्वासन देऊन मुख्याधिकाऱ्यांना शेगावमधून हटविण्याचे मान्य केले आणि १७ जानेवारीपासून सुरू असलेले काँग्रेस शहराध्यक्ष किरण देशमुख यांचे उपोषण काल, २१ जानेवारीला सुटले!

नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या बदलीसाठी काँग्रेस शहराध्यक्ष देशमुख तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. एकीकडे आंदोलन सुरू असताना वरिष्ठ स्तरावर मुख्याधिकाऱ्यांना हटविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्‍यांचे प्रयत्‍न सुरू झाले. भरीस भर त्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या विविध आघाड्यांतही चुरस लागली. महिला आघाडीने काल तर चक्क मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोलाच बांगड्या घातल्या. अखेर पाचव्या दिवशी ठोस आश्वासनाने उपोषण सुटल्याचे जाहीर करण्यात आले. आमदार राजेश एकडे यांनी ज्‍यूस देऊन देशमुख यांचे उपोषण सोडवले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय देशमुख, पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सौ. स्वाती वाकेकर, पांडुरंग पाटील, प्रकाश देशमुख, शैलेंद्र पाटील, कैलास देशमुख, केशव हिंगणे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांची मानसिकता खचणार...
राजकीय दबावातून मुख्याधिकारी डॉ. शेळके यांची बदली हाेणार असल्याने अधिकाऱ्यांचे मानसिक खच्‍चीकरण होण्यास एकप्रकारे मदतच होणार आहे. कर्तव्य पार पाडताना अधिकाऱ्यांवर येणारा राजकीय दबाव सर्वश्रुत आहे. तो दबाव झुगारून लावला की मग अशा पद्धतीने बदलीसाठी प्रयत्‍न होणार असतील आणि त्‍याला वरूनच साथ मिळणार असेल तर कोणता अधिकारी कर्तव्य निट पार पाडू शकेल, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी केला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेतील कर्मचाऱ्यांनी संपही केला. तरीही जिंकला तो राजकीय दबाव... यामुळे कर्मचाऱ्यांतही नाराजी व्यक्‍त होत आहे. उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीसाठी कुणीही उपोषणाला बसावं, आंदोलने करावं... आणि त्‍यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांची बदली व्हावी, हा संदेश जाणेही चुकीचे आहे, असे मत सुज्ञ शेगाववासीयांनी व्यक्‍त केले.

महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
उपोषणाला बसलेल्या किरण देशमुख यांच्या समर्थनार्थ व नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. शेळके यांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीने काल दुपारी आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोवर बांगड्या फेकले. पण हे आंदोलन करताना महिला पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर पडला. सुरक्षित अंतर तर नव्‍हतेच पण कुणाच्याच तोंडाला मास्क नव्हता. त्‍यामुळे पोलीस उपनिरिक्षक नितिनकुमार इंगोले यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी जिल्हा उपाध्यक्षा सुनिता कलोरे, सविता झाडोकार, मीरा माडी, डॉ. शबनम शेख, लीना भांबरे, सुशीला शिंदे, लता भांगे, कविता राजवैद्य, कविता शिंदे, माधुरी ठाकूर, स्नेहल दाभाडे (सर्व रा. शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ गजेंद्र रोहनकर करत आहेत. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एकत्र जमाव करून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा जाणीवपूर्वक भंग केला, असे तक्रारीत म्‍हटले आहे.