Amazon Ad

महायुतीची आज; आघाडीच्या उमेदवारीची घोषणा लांबणीवर! बुलडाण्यात आघाडीत उलटफेर होण्याचे संकेत;रामटेक बुलडाणा कनेक्शन काय? ...तर असे होऊ शकते...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील खलबते, बैठकांना उत आला असतानाच बुलढाण्यातील उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे. बुलढाण्याचा युती व आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आघाडीमध्ये उलटफेर होण्याचे संकेत मिळाले आहे. 
बुलढाणा मतदारसंघातील जागा वाटप व उमेदवारीचा गुंता प्रारंभी पासून गाजला. महायुतीचा तिढा तर थेट दिल्ली पर्यंत गाजला.
निवडणुका तोंडावर आल्यावर बुलढाण्याची जागा शिंदे गटाला व उमेदवार प्रतापराव जाधव असे स्पष्ट झाले. मात्र याची घोषणा होण्यात मनसेचा अडसर आला. मुंबईत आयोजित बैठकीत मनसेची अडचण कायम असल्याचे शिंदेगटाच्या सूत्रांनी सांगितले. मनसे मागीत असलेल्या जागा या शिंदे गटाशी संबधित आहेत. मनसेचा नाशिक वर देखील डोळा आहे. यामुळे शिंदे गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच 'इंजिन'ने विधानसभावर चर्चेचा मुद्धा देखील पुढे केला आहे. यामुळे बुलढाणा व अन्य ठिकाण च्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे. ती घोषणा आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा होण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली. 
    
संभाजी ब्रिगेड
युतीप्रमाणेच आघाडीतही उमेदवारीचा गुंता आहे. बुधवारी( दि २०) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात होते. त्यांनी सिंदखेडराजा व मेहकर मधील जनसंवाद सभातही उमेदवारीची घोषणा करण्याचे टाळले. 'मी देईल त्या उमेदवाराला विजयी कराल ना?' असा सवाल करून त्यांनी जिल्ह्याचा निरोप घेतला. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सांगलीत मात्र त्यांनी भरसभेत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली.
     त्यापूर्वी संभाजीनगर मध्ये संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने त्यांना गाठले. संघटनेला बुलढाणा व हिंगोली मतदारसंघ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सिंदखेडराजा येथील मराठा सेवा संघाच्या 'जिजाऊ सृष्टी' ला भेट दिली. ब्रिगेडच्या बुलढाण्यातील संभाव्य उमेदवार माजी आमदार व मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अर्धांगिनी रेखा खेडेकर या राहणार हे उघड रहस्य आहे. आता या नवीन मित्राचे कसं समाधान करायचे? हा पेचही ठाकरेंसमक्ष आहे. यामुळे उमेदवारीचा गुंता आणखी वाढला आहे. 
 
..तर तो ठरेल ठाकरेंचा पराभव....
  दरम्यान ठाकरे गटाचा सध्याचा संभाव्य उमेदवार हा 'इलेक्टिव्ह मेरिट'चा नसल्याचे काँग्रेसनेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे रामटेक सेनेला तर बुलढाणा काँग्रेसला असा प्रस्ताव ठाकरे गटाकडे देण्यात आल्याचे समजते. बुलढाणा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मतदारसंघ २००९ मध्ये खुला झाला अन रामटेक राखीव झाला. यामुळे मुकुल वासनिक यांच्यासाठी बुलढाणा राष्ट्रवादी अन रामटेक काँग्रेसला अशी तडजोड करण्यात आली होती. आताही रामटेक सेनेला अन बुलढाणा काँग्रेसला अशी अदलाबदल होण्याची अंधुक का होईना शक्यता आहे. असे झाल्यास तीनदा ठाकरेंशी भेट घेणाऱ्या जयश्री शेळके यांना संधी आहे. मात्र ठाकरे बुलढाण्यावर ठाम राहिलेच तर काँग्रेसचा नेता रीतसर मनगटावर 'शिवबंधन' बांधून अन हाती मशाल घेऊन लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतकरी नेते तुपकर यांच्या उमेदवारीसाठी देखील अनेकांनी ठाकरेंकडे शब्द टाकला आहे. उध्दव ठाकरेंना रिॲलिटी कळली तर तुपकरांना देखील उमेदवारी मिळू शकते. याचे कारण ठाकरेंना बुलढाण्यातून कोणत्याही परिस्थितीत बंडखोर प्रतापराव जाधव यांना पराभूत करायचे आहे. जाधव जिंकले तर तो ठाकरेंचा पराभव ठरणार आहे.
रामटेक , बुलडाणा काय आहे कनेक्शन?
दीर्घ कालावधी नंतर म्हणजे २००९ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला. दुसरीकडे मेहकर विधानसभा राखीव झाला. यामुळे बुलढाण्याचे आजी माजी खासदार आनंदराव अडसूळ व मुकुल वासनिक यांची गोची झाली. आमदार प्रतापराव जाधव यांची राजकीय कोंडी झाली. या तिघा नेत्यांनी त्यावर आपल्यापरीने सोल्युशन काढले. वासनिक रामटेक ,अडसूळ अमरावती मधून लढले आणि खासदार झाले. जाधव बुलढाणा लोकसभेची जागा जिंकून खासदार झाले. वासनिकासाठी काँग्रेसने बुलढाण्याची जागा राष्ट्रवादी ला सोडली.रामटेक ची जागा काँग्रेसला मिळाली. यंदाही अदलाबदल चा प्रस्ताव समोर आलाय.रामटेक सेनेला तर बुलढाणा काँग्रेसला सोडावे असा हा प्रस्ताव आहे.