अबकी बार भाजपा तडीपार; सिंदखेडराजाच्या सभेतून उध्दव ठाकरेंची नवी घोषणा! गद्दार खासदारांच डिपॉझिट जप्त करून दाखवतो म्हणाले;

माँ. जिजाऊंच्या जन्मस्थाना समोर सभा पण सभेला १०० महिलाही जमल्या नाहीत; मैदानात घेण्याऐवजी गल्लीत घेतली सभा..!
 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थनासमोर जाहीर सभा झाली. यावेळी विरोधकांचा त्यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. अबकी बार ४०० पार नाही तर अबकी बार भाजपा तडीपार अशी नवी घोषणा उध्दव ठाकरेंनी केली व घोषणा गावागावात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांनी केला. तुमची मुलं बघा स्वातंत्र्यात जगली पाहिजे असे वाटत असेल तर हुकूमशाहीला गाडा , गद्दार खासदारांना पाडा आणि भगवा फडकवा असेही ठाकरे म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Add
                         Add.👆
 यावेळी पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, काही जण असे आहेत ज्यांना इडी, सीबीआयच्या नोटिसा आल्या आणि ते लगेच शेपटा घालून भाजपात गेले. भाजप आज जे काही करत आहे ती औरंगजेबी वृत्ती आहे. फोडा तोडा आणि राज्य करा ही भाजपची वृत्ती आहे. रोज रोज त्यांच्या पक्षात ते कचरा गोळा करत आहे असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.
गद्दार खासदाराच डिपॉझिट जप्त करून दाखवतो....
 इथल्या गद्दार खासदाराला किती वेळ खासदार करायचं? पहिले आमदार केलं, मग खासदार केलं, इथल्या हिंदुत्ववादी मतदारांनी तीन वेळेस खासदार केलं, तरीही गद्दारी केली. आता या वेळेला गद्दार खासदाराच डिपॉझिट
जप्त करून दाखवतो असे उध्दव ठाकरे म्हणाले. ४०० वर्ष होऊन देखील सूर्याजी , खंडोजी यांच्या कपाळावरील गद्दारीचा टीळा पुसल्या गेल्या नाही मग या गद्दारांच्या कपाळावरील गद्दारीचा टीळा कसा पुसल्या जाईल असा सवाल यावेळी उध्दव ठाकरे यांनी केला. देशात इंडीया आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास ही यावेळी उध्दव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
 अबकी बार ४०० पार नाही तर अबकी बार भाजपा तडीपार हा नारा गावागावात जाऊद्या असे ठाकरे म्हणाले. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असे ते म्हणाले.
 तुमची मुलं बाळ स्वातंत्र्यात जगली पाहिजेत की गुलामात हे ठरवा असेही ठाकरे म्हणाले. हुकुमशाहीला गाडण्याचे आवाहन शेवटी उध्दव ठाकरे यांनी केले.
बेमानी गाडून टाका: संजय राऊत
खा.संजय राऊत म्हणाले की, मातृतीर्थ सिंदखेडराजात हा राजवाडा नाही तर हे हिंदुत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.या पवित्र भूमीत गद्दारांना थारा नाही, गद्दार इथे गाडले जातील . छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला, जिथे मोदींचा जन्म झाला. जे जे महाराष्ट्रावर चालून आहे त्यांना महाराष्ट्रातच गाडल्या गेले असे खा.राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील बेमानी गाडून टाकण्याचे आवाहन खा.राऊत यांनी शेवटी म्हणाले.
   औकात दाखवून द्या: अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले की, गद्दारांना आता माफी नाही,ही निवडणूक देशाच्या हिताची आहे. या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. भक्तिमार्ग हा विषय दलालांच्या हितासाठी चा विषय आहे, टक्केवारी मिळवण्याचा हा विषय असल्याचे ना.अंबादास दानवे म्हणाले.जे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ आपल्यातून निघून गेले त्यांना त्यांची औकात दाखवुन देऊ असेही दानवे म्हणाले.
परिवर्तन हा संसाराचा नियम: नरेंद्र खेडेकर 
नरेंद्र खेडेकर म्हणाले की, परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे. ज्यांना ३ वेळेस निवडून दिले त्यांना आता पाडायचे आहे. जे काम कधी केलं नाही त्याचही क्रेडीट खासदार घेतात असा आरोप यावेळी खेडेकर यांनी केला.
  गर्दी जमवण्यात अपयश..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा गर्दी जमवण्यात स्थानिक नेतृत्वाला अपयश आल्याचे यावेळी दिसून आले. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या मोठ मोठ्या सभा होत असताना सिंदखेडराजात मात्र नियोजनाचा अभाव दिसून आला. मातृतीर्थ सिंदखेडराजा इथे सभा असताना १०० महिला देखील मेळाव्याला जमवता आल्या नाहीत. शिवाय उध्दव ठाकरेंची सभा मोठ्या मैदानात घेण्याऐवजी आयोजकांनी छोट्या गल्लीत सभा घेतली, ज्यामुळे गर्दी जमल्याचा भास निर्माण झाला.